रस्त्यावर कोंबड्यांचा बळी देणे आले अंगलट !
देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार; परळी शहरात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
परळी (प्रतिनिधी) |
परळी शहरात देवीच्या मिरवणुकीदरम्यान आघोरी विधी करीत कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष व आयोजक दिपक देशमुख (रा. गणेशपार, परळी वै.) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) चे कलम 325 आणि महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2013 चे कलम 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी, परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापनेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास, राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला, तसेच हळद, कुंकू, लिंबू व नागवेलीची पाने टाकून अघोरी विधी केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.हा प्रकार समाजात भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असुन, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. ही तक्रार बालाजी रानबा ढगे (वय 41, रा. रामनगर, परळी वै.) यांनी दिली असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सोबत अंनिसचे सुकेशनी नाईकवाडे, विकास वाघमारे, प्रा. दासु वाघमारे आणि रानबा गायकवाड हे देखील उपस्थित होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी BNS 2023 कलम 325 – धार्मिक आस्थेच्या नावाखाली हिंसक, अमानुष व अघोरी कृती तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013, कलम 3(2) – बळी देणे व इतर अघोरी प्रथांवर बंदी कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा