व्यसनमुक्त गावसाठी व उत्कृष्ठ महामार्गासाठी ग्रामस्थ सरसावले!

 परळी वैजनाथ:पांगरी (गोपीनाथगड) येथे दारूबंदी व महामार्गाच्या निकृष्ट कामांविरोधात ग्रामस्थांचा रस्ता रोको


अन्यथा...यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा गावकऱ्यांचा इशारा

 परळी वैजनाथ, दि. 21 (प्रतिनिधी)... 

        मौजे पांगरी (गोपीनाथगड) येथे आज गावकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. गावात दारू, गुटखा आणि मटक्याच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करतानाच, परळी-सिरसाळा रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या विरोधात संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. श्रीनिवास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 जुलै 2025 रोजी तहसीलदार परळी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनात गावात व्यसनमुक्ती जाहीर करून दारूबंदी लागू करणे, पांगरी व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत ‘तडीपारी’ची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली होती.


याचबरोबर, परळी-सिरसाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी झालेली तडे, फुटलेला डांबर, विना मशीन केलेला रस्ता, व उजव्या व डाव्या बाजूस अपूर्ण पदर यामुळे होत असलेल्या अपघातांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित कामाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची जोरदार मागणी झाली. तसेच, पांगरी गावात बस थांबा, कारखाना चौक व गावाच्या मुख्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशीही ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती.


गोपीनाथगड हे महत्वाचे  स्थळ असल्याने दररोज राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र गावात दारू विक्रीमुळे बाहेरून आलेल्या लोकांनाही गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. महिलांनी या विरोधात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत दारूबंदीचा एल्गार पुकारला.


या आंदोलनाच्या दरम्यान, तहसील प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळी हजर होते. तहसीलदार परळी यांनी फोनवर आश्वासन दिले की, संबंधित यश कन्स्ट्रक्शन कंपनी, राज्य महामार्ग अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थ यांच्यात संयुक्त बैठक घेऊन रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यात येईल.


परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम व राज्य महामार्ग विभागाचे अधिकारी आंदोलनाकडे फिरकलेसुद्धा नाहीत, यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते.


पोलीस व तहसील प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


या आंदोलनात ॲड. श्रीनिवास मुंडे, माजी चेअरमन वसंतराव तिडके, महादेव मुंडे, माजी सरपंच दत्तात्रय गित्ते, बिभीषण गित्ते, गोविंद मुंडे, महादेव कराड, सचिन तिडके, ज्ञानदेव मुंडे, शरद गित्ते, बळी घोडके, मोहन मुंडे, बापू राठोड, अविनाश मुंडे, सूर्यकांत तिडके यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !