परळीत चार दिवसीय दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन
सु. श्री. मनीषा दीदीजी यांच्या दिव्य अमृतवाणीतून होणार सदभक्तांचे उद्बोधन
परळी वैजनाथ प्रतिनिधी...
परळीत दिनांक ३ जुलै २०२५ ते ७ जुलै २०२५ या कालावधीत येथील कल्याणकारी हनुमान मंदीर मानिकनगर या ठिकाणी दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सत्संग सोहळ्यामध्ये श्री सिद्धारूढ आश्रम निवाने नाशिक येथील सु. श्री. मनीषा दीदीजी या आपल्या अमृत रसाळवाणीतून सदभक्तांचे उद्बोधन करणार आहेत अशी माहिती या सत्संग सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ येथील कल्याणकारी हनुमान मंदिर माणिक नगर या ठिकाणी आयोजित दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजक परळी वैजनाथ येथील प्रेम भक्ती साधना केंद्र व हरिहर भजनी मंडळ असून जागृती नागरि पतसंस्था व जागृती मल्टीस्टेट यांच्या सौजन्याने हा सत्संग सोहळा संपन्न होत आहे. श्री क्षेत्र प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत आज पासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय सत्संग सोहळ्यास प्रेम भक्ती साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाने (नाशिक) येथील मठाच्या पद्म श्रद्धेय सु. श्री. मनीषा दीदीजी या आपल्या दिव्य अमृतवाणीतून उद्बोधित करणार आहेत. ३ जुलै ते ७ जुलै दरम्यान संपन्न होत असलेला हा दिव्य सत्संग सोहळा परळीतील सर्व सदभक्तांसाठी भक्तीरसाची पर्वणी ठरणार आहे. प्रभु वैद्यनाथाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये वैद्यनाथांच्या असीम कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या आणि सु. श्री. मनीषा दीदीजी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होत असलेल्या या दिव्य सत्संग सोहळ्याचा सदभक्तगण आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परळी वैजनाथ येथील प्रेमभक्ती साधना केंद्र, हरिहर भजनी मंडळ परळी वैजनाथ, जागृती नागरी सहकारी पतसंस्था व जागृती मल्टीस्टेट परळी वैजनाथ यांच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा