स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी....!
८ लाख ६८ हजारांचे चंदन पकडले;217 किलो चंदन हस्तगत पण आरोपी फरार
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा –
परळी वैजनाथ रेल्वे पटरीच्या उत्तर बाजूस असलेल्या पालांमध्ये चंदनाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे 217 किलो चंदन लाकूड जप्त करण्यात आले असून, त्याची एकूण किंमत रु. 8,68,000 इतकी आहे. मात्र छाप्यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती नुसार या घटनेचा तपशील असा की, दि. 23 जुलै 2025 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास, परळी वैजनाथ रेल्वे पटरी ते इराणी गल्ली या परिसरात तस्करांनी कापडी पालांमध्ये चंदन लाकूड साठवले होते. पोलिसांनी घटनास्थळी अचानक धाड टाकून मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार रामचंद्र केकान, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद भताने, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन आंधळे यांनी बजावली. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 155/25 कलम 303(2), 3(5) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा