दोन दिवसांत रस्ता तयार करून देण्याचे नप प्रशासनाचे आश्वासन
गावभागातील रस्ते ऐन पावसाळ्यात खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास-सुशील हरंगुळे
दोन दिवसांत रस्ता तयार करून देण्याचे नप प्रशासनाचे आश्वासन
परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
गोपणपाळे गल्ली, ईटके गल्ली, मुजावर वाडा भागातील रस्ते भूमिगत गटार करण्यासाठी मागील एक महिन्यापासून खोदून ठेवल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने रस्ता पूर्ववत करावा अन्यथा परळी नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवकनेते सुशील हरंगुळे यांनी दिला आहे. यासंदर्भात नप मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरात चालू असलेली भूमिगत गटार योजनेचे काम ऐन पावसाळ्यात जुन्या गावभागातील गोपणपाळे गल्ली, ईटके गल्ली, मुजावर वाडा येथे चालू केल्याने रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. वृद्ध नागरिक, विद्यार्थी यांना चालण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे.
पुढील आठवड्यात पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वैद्यनाथ भक्तांनाही खोदलेल्या रस्त्याचा त्रास होणार आहे. संत गुरुलिंग स्वामी यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात गावभागात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पालखी काढली जात असते. खोदलेल्या या रस्त्यामुळे या पालखीस त्रास होणार आहे.
भूमिगत गटार योजनेचे काम शहरभर कुठेही चालू नाही मात्र फक्त जुन्या गावभागातील गोपणपाळे गल्लीतच रस्ते भर पावसाळ्यात खोदून ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबतीत त्वरित कार्यवाही करून रस्ता पूर्ववत करावा अन्यथा परळी नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना बुधवार दि 16 जुलै रोजी देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित संबंधित गुत्तेदारास दोन दिवसांत काम चालू करण्याचे आदेश दिले. या निवेदनावर माजी नगरसेवक महादेव ईटके, भाजपा युवकनेते सुशील हरंगुळे, माजी नगरसेवक रमेश चौंडे, अश्विन मोगरकर, श्याम बुद्रे, बंडू चौंडे, धनंजय पवार यांच्यासह विभागातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा