मुख्याधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडला !
१२ लाखांच्या लाचेची मागणी, ६ लाख घेत असताना सापळा यशस्वी
माजलगाव, ता. 10 जुलै 2025 (प्रतिनिधी)
नगरपरिषद माजलगाव येथील मुख्याधिकारी (वर्ग 1) श्री. चंद्रकांत इंद्रजीत चव्हाण यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. संपूर्ण लाचेची रक्कम १२ लाख रुपये इतकी होती. सदर सापळा पिताजी नगरी, माजलगाव येथे राबविण्यात आला.
तक्रारदार हे ३० वर्षांचे पुरुष असून, त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजने अंतर्गत माजलगाव नगरपरिषदेमार्फत केलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे बिल (२ कोटी रुपये) पास करण्याच्या मोबदल्यात व उर्वरित अडथळे दूर करण्यासाठी एकूण १२ लाख रुपयांची लाच मागितल्याची माहिती पुढे आली. यातील अर्धी रक्कम म्हणजे ६ लाख रुपये तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली होती.
दि. 10 जुलै 2025 रोजी तक्रार पडताळणी दरम्यान मुख्याधिकारी चव्हाण यांनी तक्रारदाराकडे लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिताजी नगरी, माजलगाव येथे सापळा रचत, आरोपी चव्हाण यांना तक्रारदारकडून ६ लाख रुपये घेत असताना पंचासमक्ष अटक केली.
आरोपीच्या अंगझडती दरम्यान Apple कंपनीचा मोबाईल फोन, व मुख्याधिकारी माजलगाव यांचे ओळखपत्र मिळाले असून, सदर मोबाईल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. घरझडती व अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ही कार्यवाही पार पाडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा