परळीचा लौकिक वाढेल - ना. पंकजा मुंडे
ना. पंकजा मुंडेंनी मंजूर केलेल्या परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी ७२ एकर शासकीय गायरान जमीन पशुसंवर्धन विभागाला प्रदान
महसूल व वन विभागाचा आदेश निर्गमित ; महाविद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा
मुंबई ।दिनांक २२।
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मंजूर करून आणलेल्या परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी परळी व लोणी येथील ७२ एकर शासकीय गायरान जमीन महसूल व वन विभागाने पशुसंवर्धन विभागाला प्रदान केली आहे.याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.
या आदेशामुळे परळी वैजनाथ येथे नवे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परळी तालुक्यातील मौजे लोणी येथील गट क्र. ०७ मधील ८ हेक्टर ८० आर (२२ एकर) व मौजे परळी येथील स.नं. ४७८ मधील २० हेक्टर (५० एकर) अशी एकूण ७२ एकर जमीन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन मान्यता महसूल व वन विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व त्यासंबंधित नियमांनुसार ही जमीन पशुसंवर्धन विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा भागातील पशुवैद्यकीय शिक्षण व संशोधनाला नवे बळ मिळेल आणि शेतकरी व पशुपालकांना आधुनिक सेवा देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.
परळीचा लौकिक वाढेल - ना. पंकजा मुंडे
---------------------
परळीत होणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठवाड्यात एक मोठे शैक्षणिक केंद्र उभारले जाणार आहे. पंकजाताई मुंडे यांनी मंत्री होताच पुढाकार घेऊन पाठपुरावा करत शासन दरबारी हा प्रकल्प मंजूर करून घेतलेला आहे.स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवे दालन उभे राहणार आहे. पशुसंवर्धन संशोधनासाठी स्वतंत्र प्रक्षेत्र निर्माण होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना तसेच शेतकरी व पशुपालकांसाठी तांत्रिक व आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, महाविद्यालया करिता जागा उपलब्ध झाल्यामुळे आता या प्रक्रियेला गती मिळणार आहे. आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाची जोड असलेले हे महाविद्यालय परळी तालुक्याचे लौकिक वाढवेल. सोबतच राज्याच्या पशूवैद्यकीय क्षेत्राला देखील यामुळे नवी उभारी मिळेल असं सांगत ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा