गुणवंतांचा गौरव, मान्यवरांचे मार्गदर्शन व समाजकार्यास समर्पित ठरला सप्ताह
शिक्षण, संस्कृती, मार्गदर्शन आणि सेवा: अजिदादांचे अभिष्टचिंतन व सेवासंकल्प सप्ताहाचा नेत्रदीपक समारोप
गुणवंतांचा गौरव, मान्यवरांचे मार्गदर्शन व समाजकार्यास समर्पित ठरला सप्ताह
सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र ,जपून वापरा -प्रियाराणी पाटील
जिद्द आणि परिश्रमानेच यश मिळते - अश्विनी सोनवणे (जिरंगे)
टक्केवारीवर गुणवत्ता ठरवणे हा फुगवटा,या फॅडातून बाहेर पडा- प्रा.महेश पाटील
सेवा समर्पित उपक्रमांत सातत्य व व्यापकता आणणार- अजय मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सेवासंकल्प सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाने एक उत्स्फूर्त, नेत्रदीपक आणि संस्मरणीय असा सोहळा अनुभवायला मिळाला. शिक्षण, संस्कृती आणि सेवा , अजिदादांचे अभिष्टचिंतन व सेवासंकल्प सप्ताहाचा नेत्रदीपक समारोप झाला.या सोहळ्यात गुणवंतांचा गौरव, मान्यवरांचे मार्गदर्शन हे दीपस्तंभ ठरले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासंकल्प सप्ताहाचा नेत्रदीपक समारोप झाला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे (जिरंगे), जिल्हा परिषद गटनेते मा. अजय मुंडे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. महेश पाटील, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी, दिव्यांग महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगर परिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांचा समावेश होता.
गुणवंतांचा गौरव
--------------------
जेईई, नीट,सीईटी,सीए तसेच दहावी व बारावी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. याबरोबरच सेवासंकल्प सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा — योगासन, मृदंग वादन, महिला भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामान्य ज्ञान व रील स्पर्धा यामधील विजेत्यांनाही यावेळी गौरवण्यात आले.
मान्यवरांचे मार्गदर्शन ठरले दीपस्तंभ !
-----------------------
यावेळी मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे (जिरंगे) यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि परिश्रम चिकाटीने करायला हवे.यश हे सततच्या प्रयत्नांतून मिळते. त्यामुळे श्रममूल्याचे महत्त्व आपल्या मुलांना रुजवले पाहिजेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत अडसर ठरत असलेल्या मोबाईल च्या अवास्तव वापरावर बोट ठेवत सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. दररोज वर्तमानपत्र वाचनाची सवय लावा. अवांतर वाचन ही जडणघडणीचा पाया असल्याचे सांगितले. शैक्षणिक मार्गदर्शन करतांना व्याख्याते व शिक्षणतज्ञ प्रा. महेश पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत परीक्षा पद्धती, गुणांकन प्रणाली यावर भाष्य केले. केवळ आपली मुले ही रेसचे घोडे आहेत ही मानसिकता बदलावी. पालकांनी देखील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत सक्रिय सहभाग घ्यावा. परिक्षेत मिळवलेल्या टक्केवारीवर गुणवत्ता ठरवणे हा फुगवटा असुन या फॅडातून बाहेर पडा असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सेवा संकल्प सप्ताह ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाभिमुख उपक्रम राबवण्याची आदर्श संकल्पना असल्याचे सांगितले. सेवा संकल्प सारखे उपक्रम राजकीय पक्षांनी राबविल्यास जनतेला फायदा होतोच, पण प्रशासनालाही या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते असे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी यांनी सांगितले.सेवा समर्पित उपक्रमांत सातत्य व व्यापकता आणणार अशी ग्वाही जि.प.गटनेते अजय मुंडे यांनी यावेळी दिली.
यांनी दिलं यशस्वी सोहळ्यासाठी योगदान
कार्यक्रमाच्या प्रारंभी रा.काॅ. तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सेवासंकल्प सप्ताहातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यातही असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील. असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखर अंकल फुटके व चेतना गौरशेटे यांनी केले तर अजय जोशी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सहभागी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे आभार मानले.या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी, शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. सेवा संकल्प सप्ताह हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा