MB NEWS Impact:हजारो विद्यार्थ्यांना दिलासा...
ओबीसी विद्यार्थ्यांवरील अन्याय अखेर संपला; नवोदय क्षेत्रीय समितीने 'ती' जाचक अट केली रद्द
'एमबी न्यूज' ने आणला होता मुद्दा समोर; पाठपुराव्याला यश; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
परळी वैजनाथ | एमबी न्यूज वृत्तसेवा....
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अखेर आवाज ऐकला गेला आहे. नवोदय विद्यालयाच्या क्षेत्रीय समितीने प्रवेश अर्जासाठी लावलेली फक्त केंद्र सरकारच्या ओबीसी यादीतील सर्टिफिकेटची अट रद्द करत एक मोठा निर्णय घेतला आहे.
या अटीमुळे राज्य सरकारच्या ओबीसी यादीतील विद्यार्थी थेट खुल्या प्रवर्गात ढकलले जात होते, आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. ही अट ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित ठेवणारी ठरली होती. प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या वेळ, खर्च आणि प्रशासनातील अडथळ्यांमुळे पालकवर्ग प्रचंड त्रस्त झाला होता.
एमबी न्यूज ने सर्वप्रथम याबाबत आवाज उठवला होता. या अन्यायकारक धोरणाविरुद्ध या मुद्द्यावर लक्ष वेधून, ‘प्रवेश परीक्षा आधी – सर्टिफिकेट नंतर’ अशी रास्त मागणी माध्यमांमार्फत पुढे मांडली होती. यावर पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही मोठा पाठिंबा दिला.
अखेर नवोदय विद्यालयाच्या क्षेत्रीय समितीने आज अधिकृत पत्रक जारी करून ही अट रद्द केली आहे. आता राज्य यादीतील ओबीसी विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत संधी मिळणार असुन, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले आहे. हा मुद्दा मांडला गेला नसता, तर मुलांची संधी हिरावली गेली असती अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शैक्षणिक संधीतील समता आणि न्यायाची ही बाब वेळीच एमबी न्यूज सारख्या जबाबदार प्रसारमाध्यमांतून संबंधितांसमोर आल्याने ही जाचक अट रद्द झाली व विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा