MB NEWS-गरुड पक्षाला केले मुक्त
जगात सर्वत्र पक्षीधाम निर्माण करावेत : श्री काशी जगद्गुरू
गरुड पक्षाला केले मुक्त
लुधियाना (पंजाब): प्राणी, पक्षांना मुक्त जगण्याची संधी दिली पाहिजे. भगवंताने निसर्गामध्ये सर्व जीवजंतूंना जगण्याची संधी दिली आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी प्राणी, पक्षांना मारतात. आहार म्हणून सेवन करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक मनुष्याने प्राणी पक्षांना जगण्यासाठी संधी दिली पाहिजे. सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. पक्षीधामची निर्मिती जगात सर्वत्र झाली पाहिजे असे विचार श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
लुधियाना येथील पक्षीधाममध्ये सकाळच्या सत्रात आहारदान वितरण समारंभ प्रसंगी महास्वामीजींनी उपदेश केला. पंजाब मधील लुधियाना येथे २० एकर परिसरात पक्षीधाम निर्माण केले आहे. लाखो पक्षी या ठिकाणी मुक्त संचार आणि वास्तव्य करीत आहेत. लुधियाना येथील पक्षी सेवा सोसायटीने हे कार्य उभे केले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षांसाठी एक क्विंटल धान्याचे वाटप हे सदस्य करतात. ब्रेड, पनीर, बिस्कीट यांसह विविध अन्नपदार्थ पक्षांना देतात. या स्थळावर महास्वामीजींनी भेट दिली. सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून आशीर्वाद दिले.
आजारी पडलेल्या पक्षांसाठी पशुवैद्यकीय चिकित्सकांमार्फत वैद्यकीय सुविधा देतात. त्यांची सेवा सुश्रुषा करतात. पक्ष्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर आकाशात सोडतात. अशा सोयी सुविधांमुळे संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील अनेक देशातून विविध पक्षी वेगवेगळ्या ऋतूत आपापल्या सोयीने येतात. मुक्त संचार करतात. वास्तव्य करतात आणि पुन्हा निघून जातात. सोसायटीचे चेअरमन अशोक थापर, संचालक संजय थापर, सिद्धू गुड्डू या मान्यवरांचे पक्षीधामसाठी विशेष योगदान आहे. हा आदर्श उपक्रम पाहून महास्वामीजींनी असा उपक्रम जगात सर्वत्र करण्याचे आवाहन केले. पक्षीधाम सोसायटीच्या सर्व सभासदांना रुद्राक्ष माळ, श्रीकाशीपीठाची शाल, श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.
एक महिन्यापासून आजारी असलेल्या गरुडाला औषधोपचार करून बरे केले. महास्वामीजींच्या शुभहस्ते आकाशात सोडण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा