प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; 6.15 लाखांचा मुद्देमाल जप्त
परळी वैजनाथ – बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला. ही कारवाई परळी तालुक्यातील नंदागौळ परिसरात करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. तपासणी दरम्यान एका चारचाकी वाहनातून विविध कंपनीचा पानमसाला व गुटखा आढळून आला. ही उत्पादने महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असतानाही आरोपी ही वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव जाबाज खान समीर खान (वय 26, रा. मलिकपुरा, परळी) असे आहे. यासोबतच दोन आरोपी हे फरार आहेत. फरार आरोपींमध्ये अरबाज बशीर शेख (रा. पेट मोहल्ला, परळी) व दुसऱ्या आरोपीचे संपूर्ण नाव अद्याप मिळालेले नाही.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 6,15,000 रुपये असून, यामध्ये गुटखा, पानमसाला व वापरलेले वाहन यांचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. रामचंद्र केकान, पो. गोविंद भताने आणि पो.कॉ. सचिन आंधळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सदर गुन्ह्याबाबत पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा