श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळा उत्साहात
परळी वैजनाथ दि. १६ (प्रतिनिधी)
श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन १० जुलै गुरुपौर्णिमा ते गुरुवार (ता.१४) आँगस्ट पर्यंत करण्यात आले होते या सोहळ्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णा फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ५१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५२ वे वर्षे होते. १० जुलै गुरुपौर्णिमेला श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशपुजन करुन चातुर्मास सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहाटे शिवपाठ, मन्मस्वामी यांची महापूजा, रुद्रपठण, गाथा भजन, प्रवचन, किर्तन, शिवजागर, महाप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान ३५ दिवस विविध मान्यवर महाराजांच्या किर्तनांचे त्याचबरोबर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१३) टाळ आरती किर्तन संपन्न झाले. संध्याकाळी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.मन्मथस्वामी मंदिर दिपोत्सवामुळे उजळून निघाले. दरम्यान या सर्व कार्यक्रमास महाराष्ट्रातील वीरशैव समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी सप्ताह मंडळातील सर्व पदाधिकारी व शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा