नशेच्या आहारी युवक: पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर...
नातवाकडून सत्तूरने आजीवर जीवघेणा हल्ला; मायबापांनाही केलं गंभीर जखमी
नशेच्या आहारी गेलेल्या वीस वर्षीय युवकाचे कृत्य
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी : परळी शहरातील तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात आज (दि.९) सायंकाळी ६.३०वा. सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतले आहे.
ही हृदयद्रावक घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरातील कुरेशी कुटुंबात घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुबेदा इब्राहिम कुरेशी या ८० वर्षीय वृद्धा घरी होत्या. त्यांचा नातू आरबाज रमजान कुरेशी(वय २० वर्षे) हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला. या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली आहे.त्याची आई समिना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी तातडीने धावून आले, मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.
घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केवळ पंधरा मिनिटांत आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक ढोणे यशस्वी झाले. विशेष म्हणजे, आरोपीकडे धारदार शस्त्र असतानाही त्यांनी अतिशय शिताफीने आणि धाडसाने ही कारवाई केली.
मरणासन्न अवस्थेत वृद्धेवर पुढील उपचारार्थ अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तसेच गंभीर जखमी आई-वडीलांवर प्राथमिक उपचारांनंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण तलाब कट्टा परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील पोलीस प्रक्रिया सुरू आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा