श्रावणी वेदसप्ताह......परळी वैजनाथ.

 विवेक जागृतीशिवाय दुःखमुक्ती व आनंदप्राप्ती शक्य नाही !



श्रावणी वेदसप्ताहात आचार्य पं. चंद्रदेवजींचे विचार

परळी- वैजनाथ,दि.६- 

      आजकाल माणूस भौतिक साधने व सुख- सुविधांमध्ये गुरफटत चालला आहे. अविवेक व अनिष्ट विचारांमुळे वाढत चाललेली त्याची बहिर्मुख वृत्ती ही त्याला शाश्वत सुख व आनंदापासून वंचित ठेवत आहे. याकरिता आत्मज्ञानाच्या माध्यमातून विवेक जागृत होणे गरजेचे आहे. त्याशिवाय दुःखमुक्ती आणि आनंदप्राप्ती होऊ शकत नाही, असे विचार प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य पं. चंद्रदेव जी शास्त्री यांनी मांडले. 

              महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने येथील आर्य समाजात सुरू असलेल्या श्रावणी वेदज्ञान प्रचार सप्ताहात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. गेल्या ३ तारखेपासून त्यांची आध्यात्मिक सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर प्रवचने होत आहेत. 

       कालच्या सायंकालीन सत्रात त्यांनी "सुखी जीवनासाठी अध्यात्मज्ञान!"या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. ते म्हणाले - परमेश्वराची अमृतवाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदांचे तत्वज्ञान  जगातील प्रत्येक मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. वैदिक ज्ञानाच्या आश्रय घेतल्याने सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात.  वेदात प्रतिपादित विचार आणि निसर्गाचे नियम  सर्वांसाठी एकसारखेच आहेत. या ज्ञानाला अध्यात्म व विज्ञान या दोन्हींचा आधार आहे. म्हणूनच वैश्विक स्तरावरील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी वैदिक ज्ञान हे सद्यस्थितीत फारच प्रासंगिक ठरते. 

    तत्पूर्वी भजनगायक पं. राजेश आर्य यांनी "सुखी व समृद्ध कुटुंब" या विषयावर विचार मांडले.  घरातील आई- वडील व  थोरां - मोठ्यांचा आदर सत्कार केल्याने आणि त्यांच्याशी आत्मीयतेने वागल्याने परस्परातील प्रेम वाढत जाते. त्यामुळे घर हे स्वर्गासमान बनते. अशा संस्कारशील कुटुंबातूनच आदर्श संतती जन्माला येते. त्यांद्वारे सामाजिक व राष्ट्रीय कल्याण साधले जाते,असे ते म्हणाले.   

   दरम्यान दररोज सकाळी पं. वीरेंद्र शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली वैदिक यज्ञ संपन्न होतो. यात सहभागी यजमान मोठ्या श्रद्धेने आहुत्या प्रदान करतात. त्यानंतर अध्यात्मिक विषयावर भजन संगीत व प्रवचने  होत आहेत . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया मंत्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे, लक्ष्मण आर्य गुरुजी, रंगनाथ तिवार, जयपाल लाहोटी व इतर कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाची सांगता शनिवारी होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !