गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश
परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून;धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा
गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश
परळी वैद्यनाथ (दि. १८) - परळी वैद्यनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
रविवारी मध्यरात्री कौडगाव - कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली. ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली आता श्री मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ दहिफळे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जगमीत्र कार्यालयाचे समन्वयक बाबुराव रुपनर हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटना स्थळी दाखल झाले होते. पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीडचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयास संपर्क करून एन डी आर एफ च्या पथकास पाचारण करण्यात आले. हे पथकही तातडीने रवाना झाले.
दरम्यान या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२) रा. डिग्रस, राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२) रा. फुलारवाडी ता. पाथ्री या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ (वय २४) रा. बोरी सावरगाव ता. केज हा तरुण मयत झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पहाटे युवक नेते अजय मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी ग्रामस्थांशी व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा केली. धनंजय मुंडे हेही दूरध्वनीवरून रात्रभर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच त्यांचे सहकारी राजाभाऊ पौळ, सुभाष नाटकर, तसेच धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाची टीम घटनास्थळी मदत कार्यात उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा