देशातील सर्वात स्वच्छ शहराचे माॅडेल अभ्यासले !
ना. पंकजा मुंडेंचा मध्यप्रदेशात पर्यावरण विषयक अभ्यास दौरा ; 'स्वच्छ महाराष्ट्र' मोहिमेला मिळणार नवी दिशा
इंदौर शहरातील स्वच्छता आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा घेतला आढावा
इंदौर (म.प्र.) ।दिनांक ०५।
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे पर्यावरण विषयक अभ्यासासाठी मध्यप्रदेश दौर्यावर असून देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरला त्यांनी आज येथे भेट देत शहरातील ठोस कचरा व्यवस्थापन (सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट) प्रणालीची माहिती व आढावा घेतला. स्वच्छता, पर्यावरण आणि शहर व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर येथील अधिकाऱ्यांसमवेत विस्तृत चर्चा केली. पंकजाताई यांच्या या अभ्यास दौर्यातून 'स्वच्छ महाराष्ट्र' मोहिमेला नवी दिशा मिळणार आहे.
देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौर येथे पंकजाताई मुंडे यांनी बैठकीस उपस्थित राहून स्वच्छता, पर्यावरण आणि शहर व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.या बैठकीस इंदौरचे महापौर पुष्पमित्र भार्गव, आयुक्त शिवम वर्मा तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. इंदौर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांनी कबीट खेड़ी येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटला भेट देत, तिथे करण्यात येणाऱ्या अपशिष्ट जलाच्या प्रक्रियेची आणि त्याच्या पुनर्वापराबाबतच्या यंत्रणांची सविस्तर माहिती घेतली. अपशिष्ट जलाचा शाश्वत आणि परिणामकारक वापर कसा करता येतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण इंदौरमध्ये पाहायला मिळाल्याचे पंकजाताई मुंडे यांनी यावेळी नमूद केले. पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.
या दौऱ्या दरम्यान महाराष्ट्रातील शहरी भागात स्वच्छता आणि पर्यावरण विषयक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता याव्यात यासाठी इंदौरच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यात आला.या भेटीत महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या जनप्रतिनिधींसह दोन्ही राज्यातील संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा