भेदभावना दूर सारून संस्कृत भाषा मानवाला जोडते!
संस्कृतदिन समारंभात पं. चंद्रदेव आचार्य
परळी वैजनाथ, दि.१२ -
जातिभेद, पंथभेद, उच्च-नीचता, भाषिक, प्रांतीय व वांशिक भेदभावना दूर सारून संस्कृत भाषा ही मानवसमूहाला एकसंघ जोडण्याचे आणि समग्र विश्वात शाश्वत सुख आणि शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करते, असे प्रतिपादन संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य पंडित चंद्रदेव शास्त्री यांनी केले.
येथील संस्कृत प्रेमींच्या वतीने नुकताच आर्य समाज येथे सामूहिक संस्कृत दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रदेवजी आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान स्वामी विद्यानंद सरस्वती हे होते. तर यावेळी व्यासपीठावर सर्वश्री उग्रसेन राठौर, पं. राजेश आर्य, आचार्य सत्येंद्रजी, रंगनाथ तिवार, लक्ष्मणआर्य गुरुजी, पुरस्कारप्रदाते संज्योत जयपाल लाहोटी, गोवर्धन चाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री चंद्रदेवजी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्यांचे कथन केले. ते म्हणाले- संस्कृत भाषा ही जगात सर्वात प्राचीन भाषा असून तिचे वाङ्मय अतिशय समृद्ध व मौलिक स्वरूपाचे आहे. भौतिक व अध्यात्माची केंद्रबिंदू असलेली ही भाषा आधुनिक संगणक प्रणालीला सुद्धा अतिशय जवळची आहे. म्हणूनच वैज्ञानिकांनी आपल्या संशोधन प्रणालीत या भाषेला महत्वाचे स्थान दिले आहे. या भाषेचे ज्ञान सर्वांसाठी खुले असून यात व्यक्ती, समाज, राष्ट्र व अखिल मानव समूह यांच्या सर्वांगीण कल्याणाची शिकवण सामावलेली आहे.
यावेळी संस्कृत श्लोक गायन व भाषण स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या जवळपास ६० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम अशा स्वरूपाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिशु ,बाल, प्राथमिक, माध्यमिक, , महाविद्यालयीन व गुरुकुलीय अशा विविध गटांमधून घेण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धांत शहरातील २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
प्रारंभी गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैदिक मंगलगायनात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी, सूत्रसंचालन तानाजी शास्त्री, डॉ. वीरेंद्र शास्त्री, माणिक गडदे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा