काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी; पंकजा मुंडेंचा सत्ता विकेंद्रीकरणचा यशस्वी फाॅर्म्युला !
वैद्यनाथ बँकेच्या चेअरमन पदी विनोद सामत तर व्हाईस चेअरमन पदी रमेश कराड यांची बिनविरोध फेरनिवड
परळी वैजनाथ |प्रतिनिधी ....
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेची आज चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचीच पुन्हा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
वैद्यनाथ बँक निवडणूकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला सभासदांनी प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. यावेळी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे मुंडे बंधू भगिनी यांनी एकत्रित येत ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलला सर्वच्या सर्व 17 जागा जिंकण्यामध्ये यश आले होते. या बँकेवर एकहाती विजय मिळवल्यानंतर आता चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा खांदेपालट होणार का? याची उत्सुकता असतानाच विद्यमान चेअरमन विनोद सामत व व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचीच पुन्हा बँकेवर फेर निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यनाथ बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. संचालक माजी खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
१२ ऑगस्ट रोजी वैद्यनाथ बँक निवडणुकीचा निकाल लागला होता. मराठवाड्यातील अग्रगण्य बँक म्हणून परिचित असलेल्या दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत झालेल्या 13 जागेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत.या पॅनलच्या चार जागा निवडकीपुर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. निवडणूक निकालानंतर सर्वच्या सर्व संचालक मंडळाच्या जागा या पॅनलच्या आल्याने बँकेवर पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. आज नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध विद्यमान चेअरमन विनोद सामत व व्हाईस चेअरमन रमेश कराड यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी; पंकजा मुंडेंचा सत्ता विकेंद्रीकरणचा यशस्वी फाॅर्म्युला !
-----------------------
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून वैद्यनाथ बँक ही त्यांच्या नेतृत्वाखाली राहिलेली आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर ही धुरा पंकजा मुंडे यांनी समर्थपणाने पेललेली आहे. वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाशी उत्कृष्ट समन्वय व काम करणाऱ्यांना पदावर संधी देऊन सातत्याने सत्ता विकेंद्रीकरणाचा फाॅर्म्युला पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय वाटचालीत राबवलेला दिसतो. बीड जिल्ह्याच्या दोनवेळा खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे या गेल्या दोन टर्म पासून वैद्यनाथ बँकेवर संचालक आहेत. लोकसभेला पक्षाने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी करायला लावली होती. त्यामुळे काहीशा राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला पडलेल्या माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना एकहाती सत्ता असलेल्या वैद्यनाथ बँकेवर चेअरमन केले जाईल अशी शक्यता वाटत होती. सर्व संचालक मंडळाचीही याला सहज व नैसर्गिक सहमती मिळू शकली असती. मात्र पंकजा मुंडे यांनी यावेळीही आपल्या कार्यकर्त्यांनाच न्याय देण्याची भूमिका घेऊन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर चांगले काम करणाऱ्या विद्यमान विनोद सामत व रमेश कराड यांनाच पुन्हा बँकेची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सत्ता केंद्रित न करता कार्यकर्त्यांना न्याय देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा यशस्वी फॉर्मुला पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून राबविल्याचे दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा