वैद्यनाथ बँकेवर मुंडे बंधू भगिनींच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ
लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....
मराठवाड्यातील अग्रगण्य बँक म्हणून परिचित असलेल्या दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत झालेल्या 13 जागेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. या पॅनलच्या चार जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. निवडणूक निकालानंतर सर्वच्या सर्व संचालक मंडळाच्या जागा या पॅनलच्या आल्याने बँकेवर पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींचे वर्चस्व कायम राहिले आहे.
वैद्यनाथ को-ऑपरेटिव बँकेच्या एकूण 17 संचालकांच्या जागा आहेत. यापैकी चार जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सर्वसाधारण मतदारसंघाच्या बारा जागेसाठी आणि भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातील एका जागेसाठी अशा एकूण 13 जागेसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल आणि महाविकासआघाडीच्या वतीने वैद्यनाथ परिवर्तन पॅनलने निवडणूक लढवली. मात्र महाविकास आघाडीच्या वैद्यनाथ परिवर्तन पॅनल मध्ये खुल्या प्रवर्गातून केवळ दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी निवडणूक लढवली होती. १० ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. आज बारा ऑगस्ट रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण मतदारसंघातील बारा जागेसाठी मतदान झाले होते. या बाराला बारा जागा लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी जिंकलेल्या आहेत. जिंकून आलेल्या उमेदवारांचे मताधिक्यही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बँकेच्या सभासदांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी अनेक वर्ष या बँकेचे नेतृत्व केलेले आहे. आज पर्यंत त्यांच्याच विचाराचे आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील संचालक मंडळ या बँकेचे व्यवस्थापन करत आले आहे. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर बँकेचे नेतृत्व पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे विरोधात असताना अतिशय चुरशीने या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका झाल्या. मात्र त्यावेळीही सभासदांनी पंकजा मुंडे यांनाच हे नेतृत्व बहाल केले होते. या निवडणुकीच्या वेळी तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनी एकत्रितपणे नेतृत्व करत ही निवडणूक लढवल्याने प्रारंभी पासूनच ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र विरोधी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले व अर्ज माघारी घेतली नाही. त्यामुळे निवडणूक अटळ झाली. मात्र तरीही या निवडणुकीत मुंडेंच्या बाजूनेच सभासद कौल देणार या अपेक्षित होते. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या निकालातही तसेच घडले असुन प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांना फारसे मताधिक्य घेता आलेले नाही.
हे आहेत विजयी उमेदवार
-------
आज बीड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी सर्व तेरा जागांचे निकाल हाती आले, यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - विनोद सामत, प्रकाश जोशी, डाॅ राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा