स्मरण: मराठवाडा मुक्तीदिन विशेष लेख...
हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक स्वातंत्र्य सैनिक: चित्रकलेच्या माध्यमातुन राष्ट्रभक्तीची शिकवण देणारे दहिवाळ गुरुजी
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे दिनांक 12 डिसेंबर 1925 रोजी श्री.कै. दत्तात्रय नारायण दहिवाळ यांचा जन्म झाला. श्री दत्तात्रय नारायण दहिवाळ हे एक प्रसिद्ध चित्रकार असून हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सर्वांना सुपरीचीत आहेत. स्वातंत्र्यासाठी चित्रकला आणि चित्रकलेसाठी स्वातंत्र्य हे त्यांचे सुरुवातीपासूनचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी ठरतील. चित्रकलेची सेवा करण्यासाठी पहिली संधी त्यांना त्यांचे गुरु परमपूज्य श्री माधव आश्रम स्वामी महाराज दत्तवाडी नैकोटा यांनी 1936 साली मोहोला येथे दिली. त्यांनी परमपूज्य महाराजांचे चित्र अवघ्या पंधरा मिनिटातच पूर्ण करून त्यांचा आशीर्वाद मिळविला. चित्रकलेसाठीच तुझा जन्म आहे,हे महाराजांचे आशीर्वादपर शब्द प्रत्येक क्षणी स्फूर्तीदायी ठरल्याचा प्रत्यय येत गेला आहे व आजही येत आहे. बालपणापासून चित्रकलेचा छंद पहिली गुरु आपली आईच (जी की मुकी व बहिरी होती) व नाटकातून काम करण्याची आवड यातून समाज जागृतीचे विचार वाढत गेले. 1939 साली परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिराच्या मागील डोंगरावर तांबट तळे श्री. जगन्नाथ राव बर्दापूरकर (माजी व्यवस्थापक मराठवाडा दैनिक) कै. बाजीराव कुलकर्णी गंगाधरराव देशपांडे इत्यादी स्वातंत्र्य प्रेमी मंडळी चळवळीच्या संदर्भात गुप्त चर्चा करण्यासाठी एकत्र जमली असता श्री दहिवाळ गुरुजींनी पोवाडा गाऊन दाखविला व सर्वांना आकर्षित करून घेतले. पोवाडा ऐकून प्रवाहित झालेल्या कै. गंगाधररावांशी मैत्री वाढली. स्वातंत्र्य चळवळीसाठी चित्रकलेचा उपयोग करता यावा म्हणून दोघांनी स्वातंत्र्य चळवळी च्या कार्यासाठी स्वतःला झोकून दिले.
परळीत त्या काळी चालू असलेल्या एक शिक्षकी खाजगी शाळा एकत्र करून एक नवी शाळा स्थापन करण्याचे ठरवले. त्यानुसार श्री, देवीदासराव देशमुख, कै, सदाशिवराव देशमुख, कै, शिवलिंग स्वामी या तिघा शिक्षकांना तशी विनंती केली व १९४० साली श्री वैद्यनाथ विद्यालयाची स्थापना केली. मुख्याध्यापक म्हणून गंगाधर देशपांडे जबाबदारी स्वीकारली. पाहिले दोन वर्ष विनावेतन व त्यानंतर अत्यंत अल्प वेतनावर दहिवाळ गुरुजींनी चित्रकला शिक्षक म्हणून कामास सुरवात केली. स्वातंत्र्य चळवळीच्या परळीत आपल्या कार्याला गती देण्यासाठी गाढवाच्या अंगावर सरकार विरोधी घोषणा लिहून रात्रीतून ती गाढवे गावात सोडणे, सरकार विरोधी घोषणा लिहून गावभर भिंतीवर लावणे व रोज पोलीस ठाण्यात ती पत्रके गुप्तपणे नेऊन ठेवणे सतत चालू ठेवणे,पण तेवढ्याने समाधान होत नाही म्हणून सरकारी शाळेचे दप्तर नष्ट करायचे ठरवले. तसा कट रचला. या कताचे प्रमुख चित्रकार दहिवाळ गुरुजी होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1952 च्या दिवाळी अंकामध्ये लिहिलेले आहे की,
हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा हा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य विषयी जी चैतन्याची लाट पूर्ण भारतात निर्माण केली होती.
त्याचा एक भाग होता.
आणि नेहरू यांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करण्यासाठी मी प्रभावित झालो.
आणि नेहरूजीच्या मार्गदर्शनाखालीच मी हा लढा दिला.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिप्परगा येथील एका शाळेत स्वामी रामानंद तीर्थ हे शिक्षक होते.
नंतर ते अंबाजोगाई येथे आले.
व हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या सशस्त्र लढायचे नेतृत्व केले.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांशी दहिवाळ गुरुजीची विचारसरणी जुळली..
व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच स्वातंत्र्या साठी लढा देण्यास सुरुवात केली.
अशाप्रकारे गुरुजींच्या कार्याला सुरुवात झाली.
१९३९ च्या वंदे मातरम चळवळीत मोठया हिरीरीने काम करीत असताना क्रांतिकारकांचे गुप्त आदेश ,संदेश , निवेदने यांच्या प्रति तयार करून वाटणे सरकारी कार्यालयावर घोषणा लिहिणे,समाज जागृतीसाठी सभा, संमेलन, नाटक , या चित्रकलेच्या साहाय्याने विशेष रंगत आणणे चालू होते . या धामधुमीत दहिवाळ गुरुजींना स्वतःची नागपूर केंद्राची मॅट्रिक परीक्षा देत आली नाही.
१९४३ साली रविनारायण रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली "खम्मममेंट" येथे झालेल्या अखिल भारतीय किसन परिषदेच्या अधिवेशन प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीच्या काही प्रसंगाच्या अप्रतिम रेखाटनांनी अधिवेशनात विशेष बहर आणला.
कार्य करत असताना त्यांना जेलची ही शिक्षा भोगावी लागली.
स्वामी रामानंद तीर्थांच्या आदेशावरून परळीत प्रोड साक्षरता वर्ग ही घेतलेले आहेत.
महारवाड्यात शिकवणीला जाताना प्रसंगी लोकांचा द्वेष ही पत्करावा लागलेला आहे.
तरीही न डगमगता आपले कार्य चालूच ठेवले.
कारण स्वामीजींचा आदेश होता.
कारण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतलेली होती की स्वातंत्र्यासाठी लढा देईलच.
स्वातंत्र्य सैनिक म्हणून दहिवाळ गुरुजींना सन्मानपत्र ही मिळालेले आहे..
तसेच राजीव गांधी यांच्या हस्ते
तांबडपत्र ही मिळालेले आहे.
एक नामवंत चित्रकार म्हणून दत्तात्रय दहिवाळ गुरुजींची ख्याती आहे.
अनेक पुरस्काराने सन्मानित...
मरणोत्तर पुरस्कारही मिळवलेले.
अनेक थोरामोठ्यांनी त्यांच्या या कलेबद्दल गौरवोद्गार काढले. माजी शिक्षणमंत्री सदानंद वर्दे ,श्री.बाबुराव सडवेलकर (कला संचालक महाराष्ट्र राज्य) माधवराव सातळेकर,गोंधळेकर इ. नामवंतांनी काढलेले प्रशंसोद्गार त्यांच्या जवळील अभिप्राय पुस्तक बोलून दाखविते. अनेक मोठमोठ्या चित्रकाराशी त्यांचा पत्रव्यवहार होता.दलाल, एम एफ हुसेन, मुळगावकर इ.अशा या महान स्वातंत्र्यसैनिक चित्रकार कला योगी दहिवाळ गुरुजीस त्रिवार वंदन वंदन
-प्रा. श्रीकांत दहिवाळ
दत्त शाकुंतल निवास पद्मावती गल्ली परळी वैजनाथ जिल्हा बीड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा