परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद व जनशक्तीचे विराट दर्शन घेण्यासाठी मी भगवान भक्तीगडावर येतेयं - ना. पंकजा मुंडे
श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ देणार नाही
संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना भगवान भक्ती गडावरून देणार मदतीचा हात
बीड।दिनांक ३०।
राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेली दसऱ्याच्या सिमोल्लंघनाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ही परंपरा श्रद्धा व निष्ठेने जपण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांच्या पश्चात सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही परंपरा सुरू ठेवली आहे. श्वासात श्वास असेपर्यंत आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद आणि आपल्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी मी येत आहे, आपणही या असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
अठरापगड जातीसह गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांतील लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात हजेरी लावत असतो. सध्या पूर परिस्थितीने व अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण प्रत्यक्ष डोळ्याने ही परिस्थिती पाहिली आहे. मात्र पूरग्रस्तांचा आधार होण्याचे काम हे सरकार निश्चित करणार आहे. भगवान भक्ती गडावर दरवर्षी होणाऱ्या परंपरेला आपण दसरा मेळावा म्हणत असलो तरी ही काही कोणती राजकीय सभा किंवा राजकीय- सामाजिक असे व्यासपीठ नाही. अठरापगड जाती धर्मातील लाखो जनसमुदायाच्या भावना व श्रद्धेची गेल्या अनेक दशकांची परंपरा दर्शविणारे हे व्यासपीठ आहे. भगवान बाबांनी सुरू केलेल्या या परंपरेला आयुष्यभर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर जपले होते. मी देखील माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण भगवान भक्ती गडावर येणार आहे असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
_यापेक्षा आणखी साधेपणा काय असतो?_
--------------
पूर परिस्थितीमुळे यंदा मेळावा घेणार का?कसा घेणार? असे प्रश्न काहींच्या मनात आहेत. तसेच हा मेळावा साधेपणाने करणार का? असेही काहीजण विचारतात. परंतु दरवर्षीच हा कार्यक्रम साधेपणानेच असतो. इथे कोणताही मंडप उभारला जात नाही, कोणत्या व्यवस्था नसतात, खाण्याची व्यवस्था नसते, तरीही उन पावसाची तमा न बाळगता,या ठिकाणी येणारा प्रत्येक जण आपापल्या घरची शिदोरी घेऊन या ठिकाणी उपस्थित असतो. आठरापगड जातीतील गोरगरीब ,वंचित, उपेक्षित समाज घटक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि स्वयंस्फूर्तीने येत असतो. यापेक्षा आणखी साधेपणा नेमका कसा असतो? असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही परंपरा आपण खंडित होऊ देणार नाही. दरवर्षीप्रमाणे सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर भगवान बाबांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी २ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता आपण येणार आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
*संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन*
----------
सध्याच्या पूर व अतिवृष्टीच्या संकटात सुरुवातीपासूनच मी सर्वांना धीर देण्याचा व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः बांधावर जाऊन डोळ्यांनी सर्व परिस्थिती बघितली आहे. पूरग्रस्तांना धीर देण्याचे काम केले आहे. हे सरकार सर्व नुकसानग्रस्तांना निश्चितपणाने आधार देईल. संकटात सापडलेल्या पुरग्रस्तांना भगवान भक्तीगड देखील मदत करेल. यावेळी दसऱ्याच्या सणाला जे पुरणपोळी खाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी भगवान भक्ती गडावर येताना प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती नुसार चना डाळ, गुळ व गहू किंवा गव्हाचे पीठ घेऊन येण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. भगवान भक्ती गडावर या सर्व साहित्याचे संकलन करून गरजू पूरग्रस्त गावांना व नागरिकांना भगवान बाबाचा प्रसाद म्हणून आपण ते वितरित करू. अशा प्रकारचा रचनात्मक व सामाजिक भान जपणारा उपक्रमही या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांनी जाहीर केला आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा