Namo Yojana Hapta......
Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण
Namo Yojana Hapta : अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी (ता.९) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक कळ दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा करत होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या निधीची शेतकऱ्यांना मदत होईल असे सांगितले. ते म्हणाले, "मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत." असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. केंद्र सरकारच्या ६ हजारांप्रमाणे या योजनेतून राज्य सरकार ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देते. नुकताच पीएम किसानचा २० वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जमा करण्यात आला. त्याप्रमाणे आज नमोचा हप्ता जमा करण्यात आला आहे." अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामात छोटे-मोठे खर्च येतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकरी देखील या योजनेचं स्वागत करतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा