परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला न विसरणारे कासारवाडीचे विद्यार्थी!
दिवाळी सुट्टीत खास निमंत्रित करून आयोजित केला कार्यक्रम!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथील 2018-19 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती प्रिया अशोक काळे यांना खास दिवाळी सुट्टीत निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला.
बहुतेकदा विद्यार्थी शालेय जीवनातील शेवटच्या म्हणजे दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एकत्रित करून त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. प्राथमिक शाळेला शिकवणाऱ्या शिक्षकांना अशा स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाला बोलावले जात नाही किंवा असा सन्मान प्राथमिक शिक्षकांच्या सहसा वाट्याला येत नाही. परळी तालुक्यातील कासारवाडी येथील प्राथमिक शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र प्रिया काळे मॅडम यांना खास निमंत्रित करून दिवाळीत त्यांचे मार्गदर्शन घेतले. यावेळी व्यासपीठावर अंगणवाडी शिक्षिका राहीताई सिरसाट, मुख्यमंत्री युवा प्रतिनिधी कु पूजा गुट्टे यांचीही उपस्थिती होती.
या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन शाळेच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आयोजित केला होता. प्रिया काळे मॅडम यांची नुकतीच या शाळेतून बदली झालेली आहे आणि त्या नवीन ठिकाणी रुजू झालेल्या आहेत.
कार्यक्रमाच्या स्थळी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनौपचारिक गप्पा केल्या आणि शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांच्या भावनांनी भरलेला हा सुंदर सोहळा होता. शाळेत सध्या असलेल्या विद्यार्थ्यांनीही आपली उपस्थिती दर्शवून हा सोहळा पाहिला. काळे मॅडम यांचा सन्मान विद्यार्थ्यांनी केला. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या अंगणवाडी ताई राही मॅडम यांच्यासह सध्या या शाळेमध्ये मुख्यमंत्री युवा प्रतिनिधी या कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या पूजा शालीवान गुट्टे यांचाही विद्यार्थ्यांनी सन्मान केला.
श्रीमती प्रिया काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षा माध्यमातून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. तुमच्यामध्ये ती ताकत आहे. सध्या बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आपल्या गावातून यशस्वी झालेले आहेत त्यांची संख्या खूप जास्त असावी अशी माझी इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीओंकार गुट्टे, उत्कर्षा दहिफळे, अमोल दहिफळे, इंद्रजीत गुट्टे, धनश्री गुट्टे, सुषमा दहिफळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार गुट्टे याने तर आभार प्रदर्शन उत्कर्षा दहिफळे हिने केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा