दोन जणांचा गुरुकुलात धुडगूस:११ विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण तर एका वृद्धाचेही फोडले डोके
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ शहरातील ४०फुटी रोड सिद्धेश्वर नगर भागात असलेल्या वारकरी शिक्षण संस्था 'नर्मदेश्वर गुरुकुलम्' मध्ये याच भागात राहणाऱ्या दोन इसमांनी धुडगूस घातला. गुरुकुलातील दोन विद्यार्थ्यांना अगोदर रस्त्यात आडवून मारहाण केली,त्यानंतर गुरुकुलात घुसून समोर दिसेल त्याला मारहाण करत सुटले.यात ११ विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली.तसेच संस्थाचालकाचे वयोवृद्ध वडील त्याठिकाणी आले त्यांनाही जबर मारहाण करून जखमी करण्यात आले आहे.या धुडगूस प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी येथील सिद्धेश्वरनगर येथे नर्मदेश्वर गुरूकुलम् नावाची निवासी वारकरी शिक्षण संस्था आहे.या गुरुकुलात ४२ विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेत आहेत.यासोबतच ते शाळेत देखील जातात. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी गुरुकुलातले मुलं शाळेत गेले.या गुरुकुलाचे संचालक ह.भ.प. अर्जुन बालासाहेब शिंदे आहेत.मात्र या घटनेवेळी ते गुरुकुलात उपस्थित नव्हते.शाळांमध्ये सध्या सहामाही परीक्षा सुरु आहेत. शाळेतून गुरुकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोपी दिनेश रावसाहेब माने, रा. चाळीसफुटी रोड जवळ परळी वै, बाळु बाबुराव एकिलवाळे रा. सिध्देश्वर नगर परळी वै. या दोघांनी वाटेत अडवले. परीक्षेचा पेपर दाखवा म्हणाले, मुलांनी पेपर दिला नाही त्यामुळे चिडून त्यांनी सुरुवातीला या मुलांना धक्काबुकी केली.भयभीत मुलं त्यांना विरोध करत गुरुकुलात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ हे दोन लोकदेखील गुरुकुलात धडकले व धुडगूस घालायला सुरुवात केली.कंबरेचा बेल्ट व काठीने दिसेल त्याला बदडत सुटले.एवढेच नाही तर याठिकाणी काय झाले हे बघायला आलेल्या गुरुकुल चालकाचे वृद्ध वडिल बालासाहेब शिंदे यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरकुलाचे चालक अर्जुन शिंदे यांनी फिर्यादी दाखल केली आहे. गुरूकुलामधील ११ विद्यार्थ्यांना व त्यांच्या वडीलांना आरोपींनी जबर मारहाण केली. यामध्ये अनेक मुलांना हाताला, पायाला, डोक्याला मारहाण झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना परळी येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन संभाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा