परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
पंकजा मुंडेंचे पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांचे थेट नाव घेत भाष्य: जरांगे पाटलांना दिल्या जाहीर शुभेच्छा
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मराठा आरक्षणाची लढाई सुरू केलेली आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांवर टीकाटिप्पणी, आरोप प्रत्यारोप याचा मोठा सिलसिलाही बघायला मिळालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांमधून अनेक वेळा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरचा रोखही दिसून आलेला आहे. परंतु याला प्रत्युत्तर किंवा प्रतिक्रिया न देण्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी सातत्याने घेतल्याचे दिसते. मात्र आज परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेत त्यांच्या बाबतीतले भाष्य केल्याचे बघायला मिळाले. तसेच पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावरून जाहीर शुभेच्छाही दिल्या.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळी वैजनाथ येथे दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी गेल्या अनेक दिवसांपासूनच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यामध्ये अधोरेखित होणारा मुद्दा म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीतही सविस्तर असे भाष्य पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमातून केल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाला आपण सातत्याने पाठिंबाच दिलेला असल्याचे सांगत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आपण सातत्याने मांडली व त्या भूमिकेवर आपण कायम राहिलो. मराठा समाजाला निश्चितपणाने आरक्षण द्या मात्र ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण दिले जावे अशी आपली जाहीर भूमिका राहिलेली आहे. दरम्यानच्या काळात अनेक वेळा टीका टिप्पण्या झाल्या मात्र आपण कधीही, कोणाबद्दलही वाईट बोललेलो नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीतही आपण कधीही वाईट वक्तव्य केलेले नाही. किंवा त्यांच्या टीकाटिप्पणी ला प्रतिक्रिया दिलेली नाही. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे पाटील लढत असताना ते राजकारणातही नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट वक्तव्य आणि टीकाटिप्पणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनाही पंकजा मुंडे यांनी आवाहन केले. आपण सगळे मिळून समाजात सौहार्द निर्माण करू, पण चुकीचं होत असेल तर समर्थन करणार नाही. कधी कधी आपल्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले जातात आणि तेच समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने दाखवून गैरसमज व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सौहार्दा साठी आपण पुढाकार घेणार आहोत असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपण कधीच टीकाटिप्पणी केलेली नाही. ते राजकारणातही नाहीत. त्यामुळे एखाद्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु त्यांना काही लोक चुकीचे अर्थ दाखवून आपली प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करतात.गुलामीचं गॅझेट,गुलामाची औलाद असं आपण कधीच म्हटलेलं नाही असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
तसेच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणांना भेटी देणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपण धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते, त्याचबरोबर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटलो व कायद्याच्या चौकटीत जे शक्य असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा शब्द आपण सरकारच्या वतीने त्यांना दिला. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार व कायद्यानुसार प्रत्येक अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही मुंडे साहेबांची भूमिका होती तीच आपली ही भूमिका आहे. ती सातत्याने मांडली आहे. त्यामुळे एखाद्या समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हे आपले संस्कार नाहीत. त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांना सुद्धा मी दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करते असेही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा