परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
श्रीराधा ही एक महान भावना आहे जी प्रत्येकामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत आहे – साध्वी अदिती भारती
देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात भाविक आनंदित
श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचा आज भव्य समारोप; भाविकांची मोठी गर्दी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) –
अंबाजोगाई येथे दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे सुरू असलेल्या श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेचा आज भक्तीमय वातावरणात समारोप झाला. सहाव्या दिवसाच्या कथेदरम्यान कथाव्यास साध्वी अदिती भारतीजींनी गोदा देवीच्या जीवनकथेद्वारे देवी राधेचा गौरव केला आणि भाविकांना राधाभावाचे दिव्य दर्शन घडवले.
साध्वीजींनी दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इंद्रदेवाची संपत्ती हरपणे, स्वर्गातून देवी लक्ष्मीचे अदृष्य होणे आणि समुद्रमंथनातून देवी सुरभी व देवी महालक्ष्मी यांचे प्रकट होणे या अध्यात्मपूर्ण कथा रसाळ शैलीत सांगितल्या. त्यांनी श्री राधेचा महिमा वर्णन करताना सांगितले की,“श्री राधा ही श्रीकृष्णाची आह्लादिनी शक्ती आहे. त्या केवळ एका युगापुरत्या नसून प्रत्येक भक्तामध्ये प्रकट होण्याची वाट पाहत असलेली एक महान भावना आहेत.”
मंगळवेढ्याच्या संतकन्या कान्होपात्रा यांनी आपल्या जीवनातून राधाभावाचे अप्रतिम दर्शन घडवले, असे सांगत साध्वीजींनी भक्तांना भक्तीची खरी अनुभूती दिली.
समुद्रमंथनाच्या प्रसंगाचे विश्लेषण करताना त्यांनी भक्तांना पुरुषार्थाचा खरा अर्थ समजावून सांगितला आणि धर्माधिष्ठित समृद्धीच खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीचा पाया आहे यावर भर दिला. त्या म्हणाल्या, “आज जग भौतिक प्रगतीच्या शिडीवर चढत असताना व्यवस्थेतील अनेक क्षेत्रांत अस्थैर्य दिसून येते, कारण समृद्धीचा पाया अध्यात्माऐवजी केवळ पैशावर उभा आहे असे सांगितले.
कथेच्या समारोपाच्या वेळी देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संगीतमय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तीचा जल्लोष उसळला; भाविकांनी नृत्य, कीर्तन आणि जयघोषात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. किशन महाराज पवार (अध्यक्ष – मुकुंदराज महाराज मंदिर देवस्थान), श्री अर्जुन वाघमारे (तालुका प्रमुख, शिवसेना शिंदे गट), अॅड. मकरंद पत्की (अध्यक्ष, दीनदयाल नागरी सहकारी बँक), गणेश जाधव (शहर प्रमुख, शिवसेना शिंदे गट), श्री व सौ. अश्विनी साळुंके (संचालक, महेशचंद्र मंगल कार्यालय जवळगाव), श्री पूनमचंद परदेशी (ज्येष्ठ पत्रकार), श्री राकेश मोरे (महाविद्यालयीन संघ चालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), तसेच श्री महादेव गायकवाड (ग्रामीण तालुका संघ प्रमुख) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा विधी संपन्न झाला.
या प्रसंगी दिव्य ज्योती जागृती संस्थेचे प्रचारक स्वामीजी, साध्विजी व संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते.
संस्थेची स्थापना दिव्य गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून ती ‘आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे मानवाचे आणि समाजाचे आमूलाग्र परिवर्तन’ घडविण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. येथे केवळ देवाची चर्चा नाही तर शास्त्रांनी प्रमाणित केल्याप्रमाणे देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले जाते, हे वैशिष्ट्य भाविकांमध्ये श्रद्धा व आत्मिक जागृती निर्माण करणारे आहे.
अखेर देवी महालक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होताना भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले, भक्तीभावाने भारलेले वातावरण संपूर्ण परिसरात पसरले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा