वैद्यनाथ कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन’ साजरा
वाचनामुळे मनाची आणि विचाराची प्रगल्भता वाढते --डॉ. डी. के. वीर
परळी (प्रतिनिधी)....वैद्यनाथ कॉलेज मध्ये भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय व एन.एस.एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, माजी ग्रंथपाल डॉ. डी के वीर यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना, “वाचनामुळे मनाचा विकास होतो, शब्दसंग्रह वाढतो आणि विचारांची क्षमता प्रगल्भ होते,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव,मा.श्री दत्ताप्पा इटके, प्रमुख वक्ते डॉ.डी के वीर, प्रमुख उपस्थिती प्राचार्य, डॉ जे व्ही जगतकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी डॉ पी एल कराड, उपप्राचार्य प्रा. डी के आंधळे, प्रा हरीश मुंडे, आयोजक ग्रंथपाल डॉ.एस ए धांडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ एस ए धांडे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते डॉ. डी के वीर यांनी वाचन प्रेरणा आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांच्या वाचनाच्या सवयींवर प्रकाश टाकला. त्यांनी राष्ट्रपिता, महात्मा गांधी, भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतरत्न व माजी राष्ट्रपती, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महापुरुषांची उदाहरणे दिली, ज्यांनी वाचनाच्या माध्यमातून आपली वैचारिक उंची वाढवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञानप्राप्तीचे प्रचंड आकर्षण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील गती ही सर्व वाचन संस्कृतीमुळेच घडली. या महापुरुषांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास वाचनाच्या सवयीमुळेच केला आणि त्यातूनच भारताला नवी दिशा दिली."त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व व भविष्यातील भारताच्या विकासासाठी समृद्ध विचारांच्या नागरिकांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. डॉ. कलाम यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती केली असे सांगितले. या दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक अरविंद फुलारी यांनी लिहिलेला भारता प्राण तळमळला हा ग्रंथ महाविद्यालयाला श्री सुनील फुलारी यांनी भेट दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री दत्ताप्पा इटके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न, उपक्रम आणि वाचनाचे विद्यार्थ्यां जीवनामध्ये महत्त्व स्पष्ट केले. डॉ कलाम यांची साधी राहणी व उच्च विचारश्रेणी होती. त्यामुळे त्यांचे विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ रामेश्वर चाटे तर प्रा डॉ.बी पी गजभारे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा