परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी रेल्वे स्थानकावर मानवतेचा सुंदर आदर्श
सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून हरवलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी पोहोचली
पुणेहून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री पनवेल–नांदेड एक्सप्रेसने प्रवास करणारी एक अल्पवयीन मुलगी प्रवासादरम्यान एकटीच आढळली. त्या वेळी एका संशयास्पद व्यक्तीने तिला फूस लावण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य ताईबाई रोहिदास मुंडे या जागरूक महिलेच्या नजरेस पडताच त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीस हटकले व मुलीला आपल्या जवळ घेत विचारपूस केली.
यानंतर त्या मुलीसह त्या परळी वैजनाथ येथे उतरल्या आणि सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे यांच्या सहकार्याने परळी रेल्वे पोलिस ठाण्यात मुलीस सुरक्षित सुपूर्द केले.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अरुण पाठक यांनी मुलीशी संवाद साधून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. चौकशीतून समजले की सदर मुलगी मूळची हुसेनियाबाद, जिल्हा बलिया (उत्तर प्रदेश) येथील असून तिचे नाव उषा सुनील तिवारी आहे. ती आपल्या बहिणीकडे दापोडी (पुणे) येथे राहण्यासाठी आली असता घरातील किरकोळ वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती.
ॲड. पाठक यांनी त्वरित पुण्यातील भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव अजित कुलथे यांच्याशी संपर्क साधून संबंधित पोलिस स्टेशनमार्फत मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यानंतर मुलीची बहीण व भाऊजी परळी वैजनाथ येथे येऊन परळी रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय काळे यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई पूर्ण करून मुलीला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या बहिणीस सुखरूप पाहून कुटुंबीय भावुक झाले व सर्वांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
या घटनेत ताईबाई मुंडे, राजन वाघमारे, ॲड. अरुण पाठक, अजित कुलथे आणि परळी रेल्वे पोलिस ठाणे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता खरंच प्रशंसनीय आहे.ही घटना समाजात जागरूक नागरिकत्वाचे आणि मानवतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा