परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी नगर परिषद निवडणुक ; पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात 41,023 पुरुष, 38,543 महिला आणि 3 इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर, चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर, आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होईल.
या निवडणुकीत 17 प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य, तर प्रभाग क्रमांक 10 मधून तीन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण 35 नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा ₹11 लाख 25 हजार, नगरसेवकपदासाठी ₹3 लाख 50 हजार ठरवण्यात आली आहे. उमेदवारांनी दररोजचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल, तसेच 8 सेतू सेवा केंद्रे आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध आहेत. शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात फक्त दोन व्यक्तींना प्रवेश असेल. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि मतदानाचा हक्क बजवावा.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा