परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
अपेक्षीत राजकीय घडामोड: दीपक देशमुखांच्या हाती तुतारी : मुंबईत शरद पवारांच्या पक्षात केला प्रवेश
परळी वैजनाथ, प्रतिनिधी. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. राजकीय पक्षांतरे व उलथापालथी या घडामोडी सुरू असतात. त्या अनुषंगाने परळी शहराच्या राजकारणात अपेक्षित राजकीय घडामोड घडली असुन धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राहीलेल्या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
आ.धनंजय मुंडे यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे माजी नगराध्यक्ष तसेच नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून अनेक वेळा निवडून आलेले दीपक देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांपासून राजकीय सावतासुभा उभा केला होता. धनंजय मुंडे यांच्यापासून दूर जात त्यांनी आपली स्वतंत्र चूल मांडत वेगळी राजकीय भूमिका घेतली होती. एवढेच नाही तर आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार करत त्यांनी निवडणुका घोषित होण्यापूर्वीच प्रचाराची हवा निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना परळीतील प्रमुख चेहरा म्हणून दीपक देशमुख यांच्याकडे पाहिले जात होते. ते निश्चितपणाने पक्षांतर करतील अशा घडामोडी गेल्या काही महिन्यात सुरू होत्या. त्यादृष्टीने त्यांनी शहरात आपल्या प्रचाराची राळ उठवली होती. परळी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव झाल्याने दीपक देशमुख यांनी त्यांच्या पत्नी सौ. संध्या दीपक देशमुख यांची उमेदवारी घोषित करून प्रचारालाही सुरुवात केली.आज मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आ.जितेंद्र आव्हाड, खा. बजरंग सोनवणे, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड आदी पदाधिकारी उपस्थित होते. दीपक देशमुख यांनी हाती तूतारी घेतल्यामुळे परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार पक्षाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व एक मोठा चेहरा मिळाला आहे.
नेतृत्वावर नाराजी आणि नगरपरिषदेतील मनमानी कारभाराचा मुद्दा घेत वेगळी चूल
दरम्यान, दीपक देशमुख हे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. अपक्ष म्हणून निवडून येत त्यांनी परळीचे नगराध्यक्ष पदही धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भुषवलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने नगरसेवक म्हणून ते निवडून येत असतात. गेली अनेक वर्षे ते परळी शहरातील राजकारण व नगर परिषदेत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रमुख म्हणून काम करत होते.मात्र यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेत त्याच नगरपालिकेत मनमानी कशी चालते, अनियमितता चालते, प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे याबाबत पक्षात असूनही आंदोलने केली. नेतृत्व याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केलेली आहे. या मुद्द्यावरूनच त्यांनी सवतासुभा उभा करत स्वतंत्र वेगळी भूमिका घेतली आणि आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा