परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बोरखेडच्या अविनाश मिसाळ याची ‘गरुडझेप’
एमपीएससी २०२४ मध्ये क्लास-वन अधिकारी म्हणून यशस्वी पात्रता
परळी, (प्रतिनिधी):- परिस्थिती लहान असली तरी स्वप्नं मोठी असावीत असे आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण बोरखेडच्या सुपुत्राने खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे. परळी तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या छोट्याशा बोरखेड गावातील अविनाश विक्रम मिसाळ याने एमपीएससी २०२४ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून क्लास-वन अधिकारीपदासाठी पात्रता मिळवली आहे.
अविनाशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरखेड येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे झाले. बारावी लातूर येथून तर इंजिनिअरिंगची पदवी कराड येथून मिळवली. ग्रामीण भागात वाढलेला, पण स्वप्न मात्र राज्यसेवेतील मानाचे अधिकारी होण्याचे आणि तेच स्वप्न अविनाशने पूर्णत्वास नेले. अविनाश हा आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते व भाजप मागासवर्गीय सेलचे परळी तालुका अध्यक्ष विक्रम मिसाळ यांचा सुपुत्र आहे. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या विक्रम मिसाळ यांनी शिक्षणाच्या जोरावर घराण्याचे नशीबच बदलून दाखवले आहे. त्यांचा छोटा मुलगा दिलीप मिसाळ सध्या भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशसेवा बजावत आहे. तर आता अविनाशने राज्यसेवेत झेप घेत देश-राज्यसेवेची नवी पायरी गाठली आहे.
पूर्वी दोन वेळा एमपीएससीच्या मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत पोहोचलेला अविनाश आपल्या तिसऱ्या प्रयत्नात यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याच्या या धडाडी, जिद्दी आणि सातत्याला परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्हा सलाम करत आहे. बोरखेडसारख्या सीमेवरील गावातून उभा राहिलेला हा तरुण आता अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. शेतकऱ्याचा मुलगा आकाशालाही गवसणी घालू शकतो. हे अविनाशने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.
अविनाश मिसाळ यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, बोरखेडसह संपूर्ण परळी तालुका आपला मुलगा क्लास-वन अधिकारी झाला या अभिमानाने उजळून निघाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा