परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
बारावीला तीनदा नापास, दोन वर्ष केली शेती — अखेर राज्यसेवा परीक्षेत संगमच्या श्रीकांत होरमाळेचा झेंडा!
राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवत वर्ग-१ अधिकारी बनला तरुण
धारूर,प्रतिनिधी...
“अपयश ही शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते” हे वाक्य खरी ठरवत धारूर तालुक्यातील संगम येथील सुपुत्र श्रीकांत दत्तात्रय होरमाळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.
बारावीच्या परीक्षेत तीनदा नापास झालेला आणि दोन वर्षे घरची शेती केलेला हा तरुण आज वर्ग-१ अधिकारी होण्यासाठी पात्र ठरला आहे. संगमसह पंचक्रोशीत श्रीकांतच्या यशाचा मोठा गौरव होत असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.श्रीकांत हा धारूर तालुक्यातील संगम या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. गेली अकरा वर्षे तो पुण्यात राहून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत होता. शिक्षणात मागे राहिलेल्या श्रीकांतने एके काळी “आपण काही करू शकत नाही” असा विचार मनात धरला होता. मात्र, भाऊ गणेश यांच्या मार्गदर्शनाने व समुपदेशनाने त्याने अभ्यासाची दिशा बदलली आणि राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवले.तीन वेळा अपयश आल्यानंतरही न खचता त्याने अभ्यास सुरू ठेवला. अखेर यंदाच्या परीक्षेत त्याने राज्यात १४० वी रँक मिळवून यश संपादन केले. आता तो एक्साईज डिप्टी सुप्रिटेंडंट, सहाय्यक राज्यकर आयुक्त किंवा गटविकास अधिकारी या पदांपैकी एका पदावर रुजू होणार आहे.
“माझ्या गावाची आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीची सेवा करायची आहे. अडल्यानडल्यांची प्रामाणिकपणे कामे करायची आहेत,” असे श्रीकांत सांगतो. राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी श्रीकांतचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“बारावीला नापास झाल्यानंतर तो खचला होता. पण आम्ही त्याला धीर दिला, अभ्यासासाठी लागेल ती मदत केली. गेल्या अकरा वर्षांत त्याने घरातील कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. आज त्याचे यश पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो.”
- श्रीकांतची आई अयोध्या दत्तात्रय होरमाळे
श्रीकांतजी, आपण अनेक तरुण बंधू भगिनींना प्रेरणा देण्याची कार्य केले आहे! मेहनत रंग लाती है! आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐
उत्तर द्याहटवा