परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) च्या अधिवेशनाची परळीत जय्यत तयारी
शनिवारी मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा
परळी वै. या.6 प्रतिनिधी
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्य अधिवेशन दि.8 व 9 नोव्हेंबर रोजी परळीत होणार आहे. पहिल्या दिवशी शनिवार दि. 8 रोजी परळी शहरात आशा व गटप्रवर्तकांची भव्य रॅली काढून मोंढ्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हा आशा वर्कर्स फेडरेशन च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन ८ व ९ नोव्हेंबरला परळी येथील वैजनाथ मंदिर परिसरातील प्रवचन सभामंडपात होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात जन सुरक्षा विधेयक रद्द करा, चार कामगार संहिता आणि 12 तासांचा कामाचा दिवस रद्द करा, सार्वजनिक आरोग्याचे खाजगीकरण थांबवा आणि आरोग्याच्या बजेट मध्ये वाढ करा, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, योजना कर्मचाऱ्यांची एकजूट कायम करा, आदी मागण्यांचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.
परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी सातारा, नांदेड, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, धुळे - नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, भंडारा, जालना, पालघर, वर्धा, मुंबई, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, पुणे, बीड, अहिल्यानगर, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातील 210 आशा राज्य अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दि.8 रोजी सकाळी दहा वाजता वैजनाथ मंदिर परिसरातील प्रवचन सभामंडप ते मोंढा मैदाना पर्यंत आशांची रॅली निघणार आहे. मोंढा मैदानावर जाहिर सभा होणार आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशा वर्कर्स यूनियनच्या अखिल भारतीय सरचिटणीस मधुमीता बडोपाध्याय, सिटू चे सरचिटणीस एम. एच. शेख, आशा वर्कर्स यूनियनच्या अध्यक्षा आनंदी आवघडे, आशा वर्कर्स यूनियनच्या सरचिटणीस पुष्पा पाटील, कोषध्यक्षा अर्चना घुगरे, स्वागताध्यक्ष म्हणुन शेख हनिफ करीम उर्फ बहादुरभाई राहणार आहेत.
परळीत होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाची सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा सचिव कॉ किरण सावजी, कॉ सुवर्णा रेवले, हेमा काळे, आशा लांडगे, अनिता गिराम, छाया रणदिवे, कॉ जालींदर गिरी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी जय्यत तयारी करीत आहेत. तसेच जाहिर सभेला परळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा