परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नाशिकच्या कुंभाआधीच परळीत दोन दिवस कुंभमेळ्या सारखे धार्मिक वातावरण : मुलुक पीठाधिश्वरांसोबत 700 साधूंचा मेळा वैद्यनाथ चरणी नतमस्तक !
हिंदुस्थानात ना कोणी इसाई ना कोणी मुस्लिम, इथले सगळे मूळ हिंदूच - मुलुकपीठाधीश्वर राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांचं खळबळजनक व्यक्तव्य
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वृंदावनच्या मुलुकपिठाचे पीठाधीश्वर प्रसिद्ध गोसेवक संत स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज हे सातशे साधुंसह गोदावरी परिक्रमा यात्रा करत आहेत. ही यात्रा पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे दाखल झाली. एक दिवसाचा मुक्काम आणि प्रभू वैद्यनाथला रुद्राभिषेक असा दोन दिवसाचा धार्मिक सोहळा साजरा झाला. साधुसंत, भगवी वस्त्र परिधान केलेले, पिवळे वस्त्र परिधान केलेले, जटा वाढलेले वेगवेगळ्या मुद्रा धारण केलेले असे वेगवेगळ्या सांप्रदायाचे साधू यांनी वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजुन गेला होता. नाशिक येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. मात्र या कुंभाआधीच परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दोन दिवसाचा कुंभमेळाच भरल्यासारखे चित्र बघायला मिळाले. या गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीकर भाविकांनी जोरदार स्वागत केले.
गोसेवा क्षेत्रातील भारतातील प्रसिद्ध संत कथावाचक व द्वाराचार्य पदावर विराजमान असलेले वृंदावन येथील स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज हे सुमारे ७०० साधू संतांसह गोदावरी परिक्रमा यात्रा करत आहेत. या यात्रे दरम्यान त्यांनी परळी वैजनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथास रुद्राभिषेक केला व मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय विषयावर वार्तालाप करताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म एकता, गोदावरी परिक्रमेचे महत्त्व आदी विषयावर त्यांनी वार्तालाप केला
यावेळी माध्यमांशी बोलताना प.पू. राजेंद्रदास महाराज यांनी सांगितले की,गोदावरी परिक्रमा ही आपली पुरातन परंपरा परंतु गेल्या काही वर्षांपासून गोदावरी परिक्रमा काहीशी लुप्त होत चाललेली आहे. वेद, महाभारत, अठरा पुराणे यामध्ये गोदावरीचे अनंत महात्म्य वर्णन केले आहे. पूर्व काळात पूज्य संत महापुरुष गोदावरीची परक्रमा करत असायचे. आजकाल हे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. आपली ही महान सांस्कृतिक परंपरा अधिकाधिक जपण्यासाठी संपूर्ण भारतवर्शातील संत ,महापुरुष, आस्तिक लोकानी गोदावरी परिक्रमा करावी असे आवाहन त्यांनी केले. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाचे पूजन करून गोदावरी परिक्रमेला प्रारंभ झाला असून वीस तारखेला पुन्हा नाशिक येथे राम यज्ञाने या परिक्रमेची सांगता होणार आहे.
सबसे बडी सरकार प्रभू वैद्यनाथ...
-----‐----------------
कोणतेही सरकार प्रभू वैद्यनाथ पेक्षा श्रेष्ठ असत नाही. प्रभू वैद्यनाथ हेच सर्वात मोठे सरकार असून यांच्या दरबारातच सर्व संकल्प पूर्ण होतात. ब्रह्मादीक देवही यांच्या चरनाला लागतात अशी महती प्रभुवैद्यनाथाची आहे. त्यामुळे गो सेवा, गोरक्षण यासाठी राजकीय इच्छाशक्तीची बुद्धी निश्चितच प्रभू वैद्यनाथ सर्वांना देवो आणि देशावरील गोवधाचा कलंक मिटून जावा अशी प्रार्थना त्यांनी प्रभुवैद्यनाथाच्या चरणी केली.
गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण...
----------------------
यावेळी पुढे बोलताना मुलुक पीठाधीश्वर स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांनी धर्मांतराच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर परखडपणे भाष्य केले वर्षानुवर्षे चालत असलेली गोदावरी परिक्रमा लुप्त होत जात असल्याने गोदावरीच्या खोऱ्यात साधुसंतांचा वावर कमी झाला. गोदावरी क्षेत्रातील वनवासी लोकांमध्ये जाऊन त्यांना अमिष देत त्यांचे ईसाईकरण व इस्लामीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. साधू संतांच्या प्रेरणा आणि संस्कार या कमी झाल्यानेच हे धर्मांतर घडत असून ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच गोदावरीच्या परिक्रमेची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतातील कोणीही मूळ ख्रिश्चन, मुस्लिम किंवा अन्य धर्मीय नाही तर हे सर्व पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत. त्यांच्या घरवापसीचे निश्चित प्रयत्न झाले पाहिजेत. हिंदू धर्म हा एकमेव जगातील उदार मतवादी धर्म आहे जो सर्वांना सामावून घेतो असे यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन..
----------------------
दरम्यान मुलुकपठाधीश्वर राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांनी महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदन केले.महाराष्ट्र शासनाने कायदेशीररित्या गोमातेला ''राज्यमातेचा" दर्जा दिला ही अभिमानास्पद बाब असून गोमाता ही विश्वमाता आहे असे त्यांनी सांगितले.त्यामुळे गोसेवा, गोरक्षण व गो संवर्धन हीच आपली भारतीय मुळ संस्कृती असून ती जपली गेली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
सत्संगातूनच मन:शांती लाभेल
--------------‐------
सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनामध्ये व्यक्तीला मनशांती मिळाली पाहिजे यासाठीच सर्वांची धडपड आहे. मात्र मूळ सनातन संस्कृतीमध्ये मन, चित्त वृत्ती स्थिरतेसाठी सत्संग हे सर्वात मोठे साधन सांगितलेले आहे. त्यामुळे मनशांतीसाठी सत्संगाचा आश्रय घ्यावा असे त्यांनी सांगितले.
ज्योतिर्लिंग स्थानाचा वाद निरर्थक......
-----------------------
द्वादश ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही लोक विनाकारण वादविवाद उपस्थित करतात मात्र हा वाद निरर्थक असून प्रत्येक कल्पमध्ये त्या त्या स्थानाचे महात्म्य असते आणि धर्मशास्त्रांमध्ये पुराणांमध्ये त्या त्या काळानुरूप स्थान महात्मे वर्णीत असते. त्यामुळे परळी वैजनाथ हे पंचम ज्योतिर्लिंग स्थान आहेच. त्याचप्रमाणे देवघरलाही आपण कमी किंवा मोठे समजले नाही पाहिजे. मुळात ज्योतिर्लिंग स्थान निश्चितीबाबत वाद करण्यापेक्षा श्रद्धापूर्वक आपली भक्ती अर्पण केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा