अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...
नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
बीड : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदारांना निर्भय व सुलभरीत्या मतदान करता यावे , या उद्देशाने बीड जिल्ह्यातील संबंधित क्षेत्रांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे . महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि . १९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार , ही सार्वजनिक सुटी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्गमित केले आहेत .
सदर आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने शनिवार दि . २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून , त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे . यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , पाटोदा , परळी वैजनाथ , किल्लेधारूर आदी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे .
या सार्वजनिक सुटीचा लाभ संबंधित मतदारसंघातील सर्व मतदारांना मिळणार असून , मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा , यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच , या आदेशानुसार संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची व राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये , निमशासकीय कार्यालये , सार्वजनिक उपक्रम , बँका व इतर आस्थापना यांना ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे .
मतदानाच्या दिवशी कामाच्या ठिकाणी असलेल्या मतदारांना कोणताही अडथळा येऊ नये , मतदानाचा घटनात्मक हक्क अबाधित राहावा आणि लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा , या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित सर्व कार्यालयप्रमुख , आस्थापना प्रमुख व नागरिकांना या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहन केले आहे . तसेच , निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये , यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करावे , असेही त्यांनी नमूद केले आहे .
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा