अशी होणार मतमोजणीची प्रक्रिया : 9 टेबलवर प्रभाग निहाय समांतर मोजणी; मुख्य दोन फेऱ्या होणार: चार तासात सर्व निकाल येणं अपेक्षित
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया दि. ०२ डिसेंबर रोजी पार पडली. तर उर्वरित मतदान दि.२० डिसेंबर रोजी पार पडले. आज शनिवार २१ डिसेंबर रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक विभागाने त्याअनुषंगाने तयारी केली आहे. दरम्यान 9 टेबलवर प्रभागनिहाय समांतर मोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या मुख्य दोन फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी दोन तासाची अपेक्षित वेळ असुन त्या अनुषंगाने चार तासात संपूर्ण निकाल येणे अपेक्षित आहे.
परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रीयेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मतमोजणी दिनांक 21.12 .2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या करिता 9 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलासाठी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या मुख्य 2 फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 9 तर दुसऱ्या फेरी मध्ये प्रभाग क्रमांक 10 ते प्रभाग क्रमांक 17 ची मतमोजणी होणार आहे. टपाली मतमोजणी त्याच प्रभागातील त्याच टेबलवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर त्या प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अतिशय पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी तैनात रहाणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली आहे.
त्रिस्तरीय कडेकोट बंदोबस्त तैनात
दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया नगरपरिषद कार्यालय निवडणूक विभागात होणार आहे. या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यरत राहणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर 100 मीटर ची सीमारेषा आखून देण्यात आली आहे. या सीमारेषेत केवळ उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांना ओळखपत्राची पडताळणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्राबाहेर त्रिस्तरीय कडेकोट बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आदी सुरक्षा यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. यासाठी राज्य राखीव दल, राज्य पोलीस दल यांची कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा