परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
परळी (प्रतिनिधी)
शालेय जीवनात ज्या क्षणाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,यासाठी दिनांक 13 डिसेंबर २०२५ रोजी सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी विविध संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी 'वर्ल्ड ऑफ इमोशन 'या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका, समूहगीत व भाषणांनी विविध भावनांचे दर्शन घडविले व उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नवनीत कांवत सर (पोलीस अधीक्षक, बीड),सन्माननीय अतिथी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब IAS (सचिव,त्रिपुरा सरकार),स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम,शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास 'मुरंबा' या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री निशाणी बोरुले मॅडम यांचीही खास उपस्थिती लाभली होती. या सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या श्री.नवनीत कांवत सर (पोलीस अधीक्षक, बीड) यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे, तसेच शिस्त, मेहनत, आत्मविश्वास व मूल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले व भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांकडून देशसेवा घडावी,असे आवाहन केले.सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब IAS (सचिव,त्रिपुरा सरकार) यांनी आपल्या मनोगतामध्ये परळी सारख्या तालुकास्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल या ब्रँडची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकासावरती भर देऊन स्वतःचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविले पाहिजे, असे आवाहन केले.
स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी या भाषांबरोबरच आंतरराष्ट्रीय भाषा असलेल्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे व स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे,असे सांगितले व सहभागी विद्यार्थी यांचे विविध कलागुण पाहून त्यांचे कौतुकही केले. तसेच शाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन परळी पॅटर्न निर्माण केला जाईल असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री निशाणी बोरुले मॅडम यांनी आज शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना भव्य दिव्य अशा व्यासपीठावरती आपले कलागुण सादर करण्याची संधी शाळेमार्फत मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून पुढे भविष्यात या शाळेतील काही विद्यार्थी आमच्या सोबतही अभिनेते म्हणून काम करतील, यात काही शंकाच नाही, असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला व वर्षभरामध्ये शाळेमार्फत घेतल्या गेलेल्या विविध सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. तसेच शाळेतर्फे दिल्या जाणाऱ्या व भविष्यातील भौतिक व शैक्षणिक सुविधांवर प्रकाश टाकला.त्यानंतर डी.डब्ल्यू.पी.एस वंडरलँडच्या प्राचार्या कु.स्वप्नाली टाले मॅडम यांनी शाळेचा अहवाल सादर केला.
सदरील वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पोदार जम्बो किड्स, डी.डब्ल्यू.पी.एस वंडरलँड व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमधील सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी जवळपास दोन ते तीन हजार पालक उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले, ही खूप विशेष बाब होती, तर आभार प्रदर्शन शाळेचे वरिष्ठ समन्वयक श्री. सुनील येवले सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्य, कोरिओग्राफर प्रमोद शर्मा व त्यांचे सहकारी, सांस्कृतिक विभाग, शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,पालकवर्ग व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा