भरधाव वाहनांची समोरासमोर धडक;तीन ठार तर आठ जण गंभीर जखमी
बीड-अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर भीषण अपघात
अंबाजोगाई, प्रतिनिधी...बीड-अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर स्कार्पिओ व हुंडाई एक्सेंट या वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व जखमीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड - लातूर महामार्गावर लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत.तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 15 डिसेंबर सोमवार च्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लातूरहून (अंबाजोगाई) सायगाव च्या दिशेने निघालेली MH12 CY 7022 क्रमांकाची होंडाई एक्सेंट ही कार लातूर- बीड जिल्हा सरहद्दी वरील बर्दापूर नजीक आली असता समोरून अंबाजोगाई होऊन लातूरच्या दिशेने निघालेल्या MH24 V 7771 स्कार्पिओ गाडीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी धावली व अपघातातील मयत अमित सुभाष राऊत वय 36 वर्ष रा. सोमवंशी नगर ,आर्वी ता.जि. लातूर, पृथ्वी रमाकांत जाधव वय 20 वर्ष रा. खानापूर ता. रेणापुर जि. लातूर, निजामुद्दीन फसीयुद्दीन शेख व 37 वर्ष रा. सोमवंशीनगर, आर्वी ता.जि. लातूर या तीन जणांचा मृतदेह उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने बाजूला काढला. उर्वरित अश्विनी गंगासागर स्वामी वय 28 वर्ष, प्राची गंगासागर स्वामी वय 07 वर्ष, वीरभद्र उमाकांत स्वामी वय 40 वर्ष, सरस्वती वीरभद्र स्वामी वय 32 वर्ष, महेश रमाकांत स्वामी वय 31 वर्ष, गणेश रमाकांत स्वामी वय 25 वर्ष सर्व रा. आरजखेडा ता. रेणापूर जि. लातूर, दिशान इस्माईल सय्यद वय 20 वर्ष रा. काळेगल्ली लातूर, अरबाज रहमत शेख वय 21 वर्ष रा. रेणुकानगर लातूर या आठ गंभीर जखमीला सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारासाठी रवाना केले.सर्व मयतांचे मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले असल्याची माहिती बर्दापूर येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा