अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...
बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश
बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी सक्त निर्देश दिले आहेत.
आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवार / समर्थकांविरुद्ध खालीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य केल्यास लागू होणारी कायदेशीर कलमे (BNS):• कलम 189(2), BNS – सार्वजनिक सेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन,• कलम 191(2), BNS – बेकायदेशीर जमाव जमविणे • कलम 192, BNS – बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे • कलम 285, BNS – सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे • कलम 126(2), BNS – शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास प्रतिबंधात्मक कारवाई अशा कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देशित करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार व समर्थकांवर राहील. निवडणूकविषयक गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात. निवडणूक कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास संबंधित आरोपीस येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा