धर्मापुरीत प्रतिपादन ; अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नामस्मरण, शुद्ध विचार आणि सुसंस्कार हेच खरे रामराज्य – लिंबाजी महाराज तिडके




धर्मापुरीत प्रतिपादन ; अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

     माणसाने काळानुसार बदलले पाहिजे, परंतु आपल्या संस्कृतीची व अध्यात्माची कास सोडू नये. कीर्तन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मन शुद्ध करण्याचा आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रभावी मार्ग आहे. नामस्मरण, शुद्ध विचार आणि सुसंस्कार यांमुळेच खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होऊ शकते,” असे प्रतिपादन ह.भ.प. लिंबाजी महाराज तिडके यांनी धर्मापुरी येथील श्री क्षेत्र रोकडेश्वर देवस्थानद्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा हनुमान चालीसा पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात केले.

“झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरती धरी पिके ओसंडती गाई म्हशी” या संतवाणीतील अभंगावर प्रतिपादन करताना महाराजांनी रामराज्याची व्यापक संकल्पना उलगडून सांगितली. रामराज्य म्हणजे केवळ ऐतिहासिक कल्पना नसून प्रत्येकाच्या जीवनात साकार होणारी मूल्यव्यवस्था आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते, जिथे प्रेम, आदर आणि परस्परांतील स्नेह जपला जातो, तेथेच खरे रामराज्य अवतरते. प्रत्येकाने आपल्या आचरणात सकारात्मक बदल घडवून आणत सद्विचार, सदाचार आणि नामस्मरण यांचा अवलंब केल्यास समाजातही रामराज्याची अनुभूती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी साधू-संतांचे विचार जीवनात अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. काळाच्या ओघात समाज झपाट्याने बदलत असून अनेक चांगल्या गोष्टींसोबतच नकारात्मक प्रवृत्तीही वाढताना दिसतात. दररोज विविध वाईट व अंधश्रद्धेच्या गोष्टी कानावर पडत असताना विवेकबुद्धी जागृत ठेवून अशा गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. सत्कर्म, नामस्मरण आणि भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून जीवन जगल्यास प्रत्येक संकटावर मात करता येते, कारण भगवंत कायम आपल्या सोबत असतो, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी धर्मापुरीसह परिसरातील भाविक व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!