महात्मा फुलेंच्या संकल्पने नुसार आजच्या पिढीला दर्जेदार, चिकित्सक आणि जागतिक पातळीचे शिक्षण मिळावे - व्याख्याते अभिषेक सोळुंके
या देशात म.फुलेंनी खऱ्या अर्थाने समता स्थापित केली - उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार
परळी | प्रतिनिधी....
महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र, परळी येथे आयोजित कार्यक्रमात "महात्मा फुलेंच्या शाळेप्रमाणेच आजच्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते अभिषेक सोळुंके यांनी केले.
दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार हे होते. मंचावर सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, सौ. अनिता सुनील इंगळे, सौ. मनीषा हिम्मतराव अवचार, कोमलताई मस्के मॅडम आणि डॉ. ओंकार हिंदूळे,नगरसेविका अर्चना रोडे, जयश्री वडमारे, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे आणि डी. एस. डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार साहेब म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले यांनी या देशात खऱ्या अर्थाने समता स्थापित केली. स्त्री-पुरुष असो किंवा विविध जाती-धर्माचे लोक, शिक्षणाच्या आधारे सर्वांना समान हक्क मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनात व्याख्याते अभिषेक सोळुंके म्हणाले, "महात्मा जोतिराव फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत शिकणाऱ्या अवघ्या दहा-अकरा वर्षांच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने 'आम्ही धर्म नसलेली माणसे' हा निबंध लिहिला होता. त्याकाळी हा निबंध जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आणि इंग्लंडच्या राणीने प्रतिनिधी पाठवून तिचा सत्कार केला. नऊ-दहा वर्षांची मुले इतक्या चिकित्सकपणे विचार करत होती, याचाच अर्थ महात्मा जोतिराव फुले यांच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा जागतिक पातळीचा होता. आज पुन्हा तशाच दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.
म.जोतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणातूनच समाजाची प्रगती साधली, याकडे लक्ष वेधत सोळुंके म्हणाले की, "आज विविध माध्यमांतून महिलांची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. कधी 'लाडकी बहीण' सारख्या योजनांच्या माध्यमातून, तर कधी बुवा-बापूंच्या नादी लागून किंवा टीव्हीवरील मालिकांच्या प्रभावाखाली महिलांना परिवर्तनाच्या मार्गापासून दूर नेले जात आहे. अशा वेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार करणे ही काळाची मोठी गरज आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माहिती देण्यात आली की, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजरोहन होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रसिद्ध व्याख्याते नितीन सावंत (परभणी) यांचे 'महापुरुषांचे विचार व सद्यस्थिती' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले, तर आभार बी. एल. वडमारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी महेंद्र रोडे, संघरक्षित मस्के, संघपाल कांबळे, लक्ष्मण शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा