शिस्तबद्ध व मंगल वातावरणाच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी
परळीत श्री.भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शानदार शोभायात्रा ; आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ
शिस्तबद्ध व मंगल वातावरणाच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त परळी शहरात शानदार शोभायात्रा काढण्यात आली. आ. धनंजय मुंडे व नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते शोभा यात्रेचा शुभारंभ झाला. शांतता व शिस्तीच्या आदर्शाने शोभायात्रा लक्षवेधी ठरली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धर्मप्रेमी सहभागी झाले होते. सकल ब्राह्मण समाज यांच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
संत जगमित्रनागा मंदिर येथुन शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी आ. धनंजय मुंडे ,नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, आदी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करून व माल्यार्पण करून शोभायात्रेस सुरूवात झाली. नेहरू चौक - राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक- गणेशपार -नांदूरवेस - सरकारवाडा -अंबेवेस- काळाराम मंदिर पर्यंत नगरप्रदक्षिणा करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी व उपस्थित सर्व महिलांच्या शुभहस्ते भगवान परशुरामांची आरती करून जन्मोत्सव सोहळ्याचा समरोप झाला. या दिव्य सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ब्राह्मण समाज बांधव सहकुटुंब या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यात महिलांचा लक्षणिय सहभाग होता.
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. परळी शहरातून मुख्य मार्गावर शांतता व शिस्तीच्या आदर्शाने निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. 'भारत माता की जय','वंदे मातरम्','जय श्रीराम -जय परशुराम' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करून नागरीकांनी भगवान परशुरामाचे दर्शन घेतले. जुन्या गावभागात जागोजागी रांगोळी व महिलांनी भगवान परशुरामांचे औक्षण करून दर्शन घेतले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धर्मप्रेमी नागरीक, सर्व ज्ञातीय बांधव, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सकल ब्राह्मण समाज आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा