आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...
राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोरांची शिकार; चार शिकारी ताब्यात
राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणार्या चार जणांना मध्यरात्री ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्ती मोरांची शिकार करण्यासाठी मांडवखेल परिसरात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चार जण मोरांची शिकार करत असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले आणि वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळावरून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तसेच मृत मोर जप्त करण्यात आले. वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केल्याने आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता असून, या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा