आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

 सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

परळी प्रतिनिधी -

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर बुद्ध रूपाची भव्य शोभायात्रा सम्राट अशोक बुद्ध विहारातून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत पुन्हा विहारात दाखल होईल. सकाळी ११.३० वाजता पूज्य भिक्खू संघदान व उपासकांना भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारच्या सत्रात पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर यांच्या शुभहस्ते बुद्ध रूपाचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी विविध भन्तेजींची प्रमुख उपस्थिती लाभणार असून धम्मदेशना देखील आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी ७ वाजता सम्राट अशोक बुद्ध विहार लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री  आ.  धनंजय मुंडे  राहणार आहेत. उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य  ना.  संजय शिरसाट  उपस्थित राहणार आहेत.

विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री  ना. पंकजाताई मुंडे तसेच प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन  डॉ. हर्षवर्धन कांबळे  उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात महाराष्ट्राच्या आवाजाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले ख्यातनाम गायक  आनंदजी शिंदे यांच्या प्रभावी उपस्थितीत भीम गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तो या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सम्राट अशोक बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, यशोधरा महिला मंडळ सिरसाळा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजकांनी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुद्ध व धम्माच्या या प्रेरणादायी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या