श्री भगवान परशुराम : ब्राह्म तेज व क्षात्र तेज यांचा अपूर्व संगम
श्री भगवान परशुरामांनी ब्राह्म तेजाचे, क्षात्र तेजाचे, ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन संगोपन केले, तसेच ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन - संगोपन करणार्या ऋषीमुनींचे ही संरक्षण केले. ब्राह्मण कुळात जन्मलेले श्री भगवान परशुराम की ज्यांचे मुखात चार वेद आहेत, पाठीवर बाणा बाणासह धनुष्य आहे, हातात परशू आहे म्हणजेच ज्यांचेत अद्वितीय असे ब्राह्म तेज आणि महापराक्रमी क्षात्र तेज आहे असे राम शाप देऊन किंवा बाण/परशू ने दुर्जनांचा नाश करतील.
श्री भगवान परशुराम हे सप्त चिरंजीव यांचे पैकी एक मानले जातात. भगवान विष्णू च्या नऊ अवतरांपैकी श्री भगवान परशुराम हा सहावा अवतार होय. एकोणिसाव्या त्रेतायुगात, महाभारतानुसार त्रेता आणि द्वापार युगाच्या संधिकालात वैशाख महिन्याच्या तृतीयेला म्हणजे अक्षय्य तृतीयेला सूर्यास्ताच्या संधिकाली महर्षी भृगू ऋषींच्या वंशात आदिती नक्षत्रावर जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. श्री भगवान परशुराम यांचे जन्म निमित्त वै. शु. तृतीयेला श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. राम असे या बालकांचे नामाविधान झाले. परशुरामांना राजवीमर्दन असेही म्हंटले जाते. भृगू ऋषिंपासून श्री परशुराम हे त्यांचे कुळातील सातवे महापुरुष होय.
सह्यकेय दैत्य इंद्राला त्रास देई. इंद्राने शिवाची प्रार्थना केली. दैत्यांचा पाडाव करण्याची जबाबदारी शिवाने परशुरामांवर सोपविली. या वेळी झालेल्या युद्धामध्ये दैत्य सह्यकेय साल्वाचे मस्तक परशुरामांनी उडवले व या दैत्यापासून इंद्राची सुटका झाली. परशुरामाचे धैर्य, पराक्रम, तेज आणि असामान्य शस्त्रास्त्रातले कौशल्य पाहून भगवान शंकरांनी परशुरामांना धनुर्विद्या दिली. तसेच परशुरामांनी भगवान शंकराकडून सांबरी विद्या आत्मसात केली. श्री महागणपती कडून परशुरामांना परशू विद्या मिळाली. परशू आणि परशू विद्या प्राप्त झालेले राम हे परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले.
श्री परशुरामांनी महेंद्र पर्वतावर स्वतःचे निवासाचे स्थान निश्चित केले. श्री परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत असताना समुद्राला भरती आली, आज्ञा करूनही समुद्र मागे न हटल्याने श्री परशुरामांनी समुद्राकडे बाण सोडला, त्यामुळे समुद्र मागे हटला, हा बाण जेथे पडला तिथं पर्यंत समुद्र मागे गेला. पश्चिमे कडील जागा मोकळी झाली तिला अपरान्त नाम प्राप्त झाले. याच भूमीला कोकण भूमी म्हंटले जाते.
कोकण प्रदेशात तसेच महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकात श्री भगवान परशुरामांची मंदिरे आहेत. सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यात, कोकणात चिपळूण येथे तसेच गोमंतकात ’कोणकोण’ येथे परशूरामांचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरांमध्ये श्री भगवान परशूरामांचे देखण्या मूर्ती विराजमान आहेत. महाराष्ट्रातील दापोली गावाजवळील बुरोंडी या गावात असलेल्या परशुराम भूमीत अर्धगोलाकार पृथ्वी आणि त्यावर 21 फूट उंचीची श्री भगवान परशुरामांची विशाल मूर्ती विराजमान असून त्याचे लगतचा परिसर हा अवश्य भेट देऊन पहावा असा आहे. पितृ आज्ञेचे पालन करणारे मातृभक्त असे श्री परशुरामांचे व्यक्तिमत्त्व आहे. अश्या चिरंजीव महापराक्रमी महातेजस्वी श्री भगवान परशुरामांना त्रिवार वंदन !
- ॲड. भानुदास शौचे,नाशिक
मो.नं 8275273699
छान
उत्तर द्याहटवा