उष्मघातापासून बचाव करण्याच्या सूचना
बीड, दि. 30 (जि. मा. का.) उष्माघाताची कारणे-उन्हामध्ये शारिरीक श्रमामुळे,उन्हात मजुरीचे कामे फार वेळ करणे,कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे,जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.घट्ट कपड्यांचा वापर करणे.उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.लग्न उत्सव, यात्रा याठिकाणी अति उन्हात थांबणे व फिरणे,
उष्माघाताचे लक्षणे-
चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे,शरीराचे तापमान खूप वाढणे,पोटात कळा येणे,शरीरातील पाणी कमी होणे,त्वचा कोरडी होणे,डोके दुखणे.बेशुद्ध होणे अथवा अस्वस्थ होणे,
जोखीम गट-
5 पेक्षा कमी वयाची बालके 65 पेक्षा जास्त वय असणारे जेष्ठ नागरिक,अधिक कष्टाची सवय नसणारी व्यक्ती. धूम्रपान, मद्यपान करणारी व्यक्ती,मुत्रपिंड,-हदयरोग, यकृत,त्वचा विकार,लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. अति आद्रता, वातानुकुलनाचा अभाव, शेतकाम, कारखान्यातील काम करणारे कामगार, उष्णतेशी संबधित व्यवसाय करणारे व्यक्ती.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे-
पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरी दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टीव्ही किंवा वर्तमान पत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा,
हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा.
प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
उन्हात काम करत असलेल्या कामगारांनी / व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा,शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्या ओ.आर.एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी इत्यादीचा नियमित वापर करावा.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे
ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना / पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी,
गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
काँक्रीट घराचे छतावर पांढरा रंग द्यावा.
टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडवा यांचे आच्छादन करावे,
छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहाय्याने झाकाव्यात.
अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणचे अध्यक्ष बीड यांनी दिल्या आहे.
*******
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा