मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...
थोर महात्म्यांच्या विचारांचा जागर करत अंबाजोगाई ते कळंब लोकसंवाद पदयात्रेचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
अंबाजोगाई ते कळंब तालुक्यांतील सुमारे २० गावांमधून लोकशक्तीच्या चैतन्याला साद घालणारी आणि थोर महात्म्यांच्या विचारांचा जागर करीत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे लोकशिक्षण करणारी आश्वासक लोकसंवाद पदयात्रा सोमवार, दिनांक २७ एप्रिल पासून अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथून सुरू झाली असून, कळंब येथे १ मे २०२६ रोजी या लोकसंवाद पदयात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती पदयात्रेचे प्रमुख संयोजक डॉ.सोमनाथ रोडे यांनी येथे दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी स्मृतीवर्ष, सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती, कस्तुरबा व महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही पदयात्रा केवळ जनाधारावर चालणार आहे. त्यामुळे जनतेने स्वेच्छेने पदयात्रेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. विविध संस्था व संघटनांच्या समन्वयातून ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली असून साधारणतः दररोज तीन ते चार गावातून सेंद्रीय शेती, गोबर गॅस, गांडूळ खत निर्मिती, पारंपरिक बियाणांचे जतन, स्वदेशीचा वापर, पर्यावरण संतुलन, अंधश्रध्दा निर्मूलन, ग्रामसफाई, महिला सक्षमीकरण, कुटुंब नियोजन, वृक्ष संगोपन, जमीन आणि पाणी व्यवस्थापन, रक्तदान, संविधानात्मक मूल्यांची जोपासना, व्यसनमुक्ती, योग आणि आरोग्य शिक्षण, लोकनीतीचे सक्षमीकरण, एड्स समज आणि गैरसमज, सौरऊर्जा, प्लॅस्टीक निर्मूलन इत्यादी प्रश्नांबाबत लोकजागरण करण्यात येणार आहे. लोकसंवाद पदयात्रेच्या दरम्यान महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे व मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शनही ग्रामस्थांना लाभणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
राळेगण सिद्धी, हिवरे बाजार (अहिल्यानगर), आनंदवन (चंद्रपूर), कडवंची (जालना), पाटोदा (छत्रपती संभाजीनगर) आणि लेखा-मेंढा (गडचिरोली) या गावांच्या धर्तीवर स्थानिक ग्रामस्थांच्या व विशेषतः तरूणांच्या सामूहिक प्रयत्नांतून नवे गाव, नवे चैतन्य साकार व्हावे ह्या प्रामाणिक जाणीवेतूनच ही जनाधारित लोकसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण, स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच ही जनाधारीत पदयात्रा होय. लोकसंवाद पदयात्रेच्या कालावधीत ग्रामविकास व अन्य परिवर्तनाच्या चळवळीस उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीची व्यवस्था पदयात्रेसोबत राहणार आहे. पक्षनिरपेक्ष विचारांशी बांधिलकी मानणारी आणि सांप्रदायिक सद्भावना जागवणारी ही एक विचार दिंडीच आहे. गाव, ग्रामस्थांशी अस्मिता असणाऱ्यांनी या लोकसंवाद पदयात्रेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन लातूर जिल्हा सर्वोदय मंडळ, लातूर, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, अंबाजोगाई, मराठवाडा जनता विकास परिषद (शाखा- लातूर, अंबाजोगाई, कळंब) व अंधश्रध्दा निर्मूलन समिती (शाखा - लातूर, कळंब, अंबाजोगाई) च्या वतीने प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, शिवाजी खोगरे, माधव बावगे, शरद देशपांडे, नागनाथ तोंडारे, प्रदीप चव्हाण, शिरिष आपेट, दयानंद देशमुख, हरीदास तम्मेवार, नरसिंग घोडके, के.ई.हरिदास, दादाराव शिंदे व प्रा.शंकर भोसले यांनी केले आहे. या लोकसंवाद पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ (मुंबई), जिल्हा सर्वोदय मंडळ (लातूर), समाज भारती (लातूर), माध्यम (लातूर), स्वराज अभियान (लातूर), राष्ट्रसेवा दल व अंधश्रद्धा निर्मूलन समिती ( कळंब ,लातूर, अंबाजोगाई ), जी-२४ (लातूर), सत्यशोधक समाज (छत्रपती संभाजीनगर), जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ (अंबाजोगाई) व ग्रामस्वराज्य प्रतिष्ठान (वसमत) आदी संस्था-संघटनांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा