मार्गदर्शक सूचना जारी
परळी वैजनाथ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सुधारणा कामांना मंजुरी; पाच जलकुंभांची होणार तातडीने दुरुस्ती
नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची माहिती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जलकुंभांच्या दुरुस्तीसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत (बंधनकारक अनुदान) ४५ लाख १९ हजार ८८३ रुपयांच्या विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा जलकुंभ दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून सादर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा सुधारणांच्या प्रस्तावास १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, 'बद्ध अनुदानातून' निधी पाणीपुरवठा आणि जलपुनर्भरण कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या कामांना तांत्रिक मान्यता दिली होती, ज्यावर आता प्रशासकीय मंजुरीची मोहोर उमटली आहे. मंजूर करण्यात आलेल्या निधीतून शहरातील १. नगर परिषद कार्यालयाजवळील पाण्याची टाकी दुरुस्ती.,२. मोंढा परिसरातील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती. ३. उड्डाणपूल परिसरातील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती.,४. शिवाजीनगर थर्मल येथील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती., ५. उड्डाणपूल परिसरातील दुसऱ्या जलकुंभाची दुरुस्ती अशी पाच जलकुंभांची दुरुस्ती तातडीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीमुळे परळी शहरातील अनेक जुन्या पाणी टाक्यांची दुरुस्ती होऊन पाणी गळती थांबण्यास आणि नागरिकांना नियमित पाणी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजाखान पठाण, पाणीपुरवठा सभापती सौ जयश्रीताई गीते, मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी व्यक्त केला आहे.
पाच जलकुंभ दुरुस्तीची होणार परिपूर्ण कामे.....
दरम्यान या मंजूर लेखीतून परळी शहराच्या पाणीपुरवठासाठी मुख्य असलेल्या पाच जल कुंभांची परिपूर्ण दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये जलकुंभामधील गाळ काढणे, आतून प्लास्टर, कलर ,नविन वॉल, फॅब्रिकेशनच्या शिडी भेगा भरणे व काँक्रीट दुरुस्ती, गंजलेले स्टील दुरुस्त करणे, छत/भिंतींचे मजबुतीकरण, जल कुंभार लिकेज थांबवण्यासाठी केमिकल कोटिंग,आतील बाजूस फूड-ग्रेड वॉटरप्रूफिंग, क्लोरीनेशन करून निर्जंतुकीकरण, इनलेट/आउटलेट पाइप तपासणी,व्हॉल्व्ह, फ्लोट व्हॉल्व्ह बदलणे,बाहेरील रंगकाम सुरक्षा रेलिंग, जिने दुरुस्ती तसेच आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या केला जाणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा