सध्या सोशल मीडियावर “काॅक्रोच जनता पार्टी” हा शब्दप्रयोग जबरदस्त ट्रेण्ड होत आहे. राजकीय टोलेबाजी, मीम्स आणि व्हायरल पोस्टमधून झुरळांचा उल्लेख उपरोधिक पद्धतीने केला जात असताना, दुसरीकडे परळी वैजनाथ शहरात असे एक मंदिर आहे जिथे शेकडो वर्षांपासून झुरळांना चक्क देवत्वाचा दर्जा दिला जातो! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरच्या पावन भूमीत वसलेले झुरळे गोपीनाथ मंदिर हे सुमारे ३०० वर्षांपुर्वीचे मंदिर सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. कारण येथे झुरळांना क्षुल्लक समजून दुर लोटले जात नाही तसेच केवळ सहन केले जात नाही, तर त्यांच्याकडे “गोपिकांचे रूप” म्हणून पाहिले जाते. आणि देवस्वरुप समजले जाते.
आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्णाने कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी गोपिकांना झुरळांच्या रूपात पृथ्वीवर वास्तव्य करण्याचा वर दिला. त्यामुळे या मंदिरातील झुरळांना “गोपिकांचे रूप” मानले जाते. गणेशपार भागातील बडवे कुटुंबातील एका व्यक्तीला स्वप्नात श्रीकृष्णाने दर्शन देत घराशेजारील ठिकाणी मूर्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर खोदकामात शालिग्राम पाषाणातील चतुर्भुज विष्णूमूर्ती सापडली आणि तेव्हापासून या मंदिराची ओळख “झुरळे गोपीनाथ” अशी झाली.
हे मंदिर जमिनीपासून जवळपास दहा फूट खोल गाभाऱ्यात आहे. दहा पायऱ्या उतरून भाविकांना दर्शनासाठी जावे लागते. गाभाऱ्यातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असून मूर्तीभोवती सतत झुरळांचा वावर दिसतो. मूर्तीसमोर उभे राहिल्यावर भाविकांना “भीती”पेक्षा “भक्ती”चा अनुभव येतो. विशेष म्हणजे मंदिरात झुरळे असूनही येथे कोणतीही दुर्गंधी जाणवत नाही.
परळी क्षेत्रात हर आणि हरी या दोघांचेही महत्त्व आहे. वैद्यनाथ म्हणजे महादेव तर गोपीनाथ म्हणजे विष्णू. त्यामुळे वैद्यनाथ दर्शनानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची परंपरा आजही कायम आहे. “काॅक्रोच जनता पार्टी” या नावाने सोशल मीडियावर विनोद, मीम्स आणि राजकीय टीका सुरू असताना, परळीतील हे मंदिर मात्र एक वेगळाच संदेश देताना दिसते — ज्याला जग तुच्छ समजते, त्यालाही श्रद्धा देवत्व देऊ शकते! एका बाजूला झुरळांवर जोक्स आणि ट्रोलिंग, तर दुसऱ्या बाजूला झुरळांनाच गोपिकांचे रूप मानणारी परळीची परंपरा… हा एक दुर्मिळ योगायोगच आहे.
इतिहास, श्रद्धा आणि रहस्य यांचा संगम असलेले हे मंदिर आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यात सभामंडपात पाणी गळते, भिंती ओलसर होतात आणि भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या अनोख्या धार्मिक वारशाच्या जतनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा