मयत तोहीद खान कुटुंबीयांची नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यानी भेट घेऊन केलं सांत्वन
ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा ही परळीची संस्कृती !
दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही सर्वांचीच भूमिका - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधकारी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
परळी वैजनाथ शहरातील तरुण तोहीद खान यांच्या दुर्दैवी हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी रविवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी आपण कुटुंबासोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तोहीद खान यांची हत्या ही केवळ एका कुटुंबावर झालेला आघात नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी घटना आहे. अशा अमानुष व क्रूर कृत्याचा त्यांनी तीव्र निषेध करत आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा ही आपल्या परळीची संस्कृती असुन ती जपत अशा प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच सर्वांची भूमिका आहे असे नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती सौ.अंजलीताई माळी, सौ. सारीकाताई हरंगुळे उपस्थित होत्या.या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, ही सर्वांचीच रास्त मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लवकरच परळी शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय शिष्टमंडळ बीडचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये, अफवांना बळी पडू नये आणि शांतता अबाधित राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. परळी शहराची ओळख हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा यासाठी असून काही गुन्हेगारांच्या कृत्यामुळे समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नये, असे त्या म्हणाल्या. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे; मात्र त्याचवेळी प्रेम, शांतता आणि बंधुभावाची परंपराही जपली पाहिजे. न्यायासाठी संघर्ष करूया, पण परळीचा भाईचारा आणि सामाजिक सलोखा कायम राखूया असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा